आम्हाला घरी जायचंय... खूप तणावात आलो आहोत आम्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 03:49 PM2020-03-27T15:49:58+5:302020-03-27T15:52:02+5:30
परभणीच्या विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा; आई-वडील दररोज करीत आहेत फोन
सोलापूर : दहावीच्या परीक्षेला आम्ही सोलापूरच्या आश्रमशाळेतून फॉर्म भरला होता. परीक्षा सुरू असताना अचानक लॉकडाऊन झाला, आज आम्ही शिक्षकाच्या घरी आहोत. आम्ही खूप तणावात आलो आहोत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
परभणी येथील रहिवासी असलेल्या तीन विद्यार्थ्यांनी सोलापुरातील केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय भाटेवाडी, डोणगाव, उत्तर सोलापूर येथून दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी २७५ कि.मी. अंतरावरून सोलापुरात आले होते.
दि.२२ मार्चपासून परीक्षेला सुरुवात झाली होती. दि.२२ मार्च रोजी देशभरात जनतेचा कर्फ्यू पुकारण्यात आला होता; मात्र अचानक देशात व राज्यात दि.२२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने त्यांचा दि.२३ मार्च रोजी होणारा शेवटचा पेपर रद्द झाला. मात्र एस.टी. व रेल्वे दोन्ही सेवा बंद झाल्याने विद्यार्थी आश्रमशाळेत अडकले. शाळेत विद्यार्थी ठेवता येत नसल्याने परभणीतील पाच विद्यार्थ्यांना डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे राहणारे शिक्षक गणेश भगत यांच्या घरी ठेवण्यात आले आहे.
प्रेम पंढरीनाथ गायकवाड (वय २०, रा. परसावत नगर, जि. परभणी), राधिका प्रल्हाद रणखांब (वय १८), ओम प्रल्हाद रणखांब (वय २१ दोघे रा. मु.पो. बामणी ता. जिंतूर जि. परभणी) हे विद्यार्थी सध्या सोलापुरात अडकले आहेत. तिघांचे आई-वडील शेतमजूर असून, परिस्थितीमुळे शिकता येत नाही.
सोलापुरातील केंद्रीय आश्रमशाळेतून तिघांना फॉर्म भरला आहे. घरी बसून अभ्यास केल्यानंतर ते परीक्षेसाठी सोलापुरात आले होते. मुले अजून घरी न आल्याने आई,वडील चिंता करीत आहेत. आम्ही किती दिवस राहायचं आणि काय खायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुले आमच्या घरी वास्तव्यास आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा सारखा फोन येत आहे; मात्र येथून त्यांना पाठवायचं कसं हा प्रश्न पडला आहे. शासनाकडून काही विशेष बाब म्हणून सोय करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे.
- गणेश भगत, शिक्षक, केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय,
भाटेवाडी, डोणगाव, उत्तर सोलापूर.