सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी मुंबईत ठोकला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:59 PM2019-09-23T12:59:39+5:302019-09-23T13:03:15+5:30
विधानसभा निवडणुक राजकारण; प्रतीक्षा संपेना, भाजप प्रवेशाचे मुहूर्त रखडले; कार्यकर्ते अस्वस्थ
सोलापूर : विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी मुंबई गाठली आहे. भाजप प्रवेशाची चर्चा असलेले नेते मुंबईत मुक्काम ठोकून असून, अद्याप त्यांना मुहूर्त सापडलेला नसल्याने इकडे कार्यकर्ते बेचैन झाले आहेत.
भाजप प्रवेशाची चर्चा असलेले अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. रविवारी आमदार म्हेत्रे व त्यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे दोघे एका मंदिरात पूजेचे ताट व हातात कमळाचे फूल घेऊन बसल्याचे हे छायाचित्र आहे. भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या म्हेत्रे यांच्या हाती कमळ अशी कमेंट असलेले हे छायाचित्र आज चर्चेचे ठरले; मात्र हे छायाचित्र दीड वर्षापूर्वी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात काढले असल्याचे स्पष्टीकरण सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहे.
तर इकडे कार्यकर्ते वारंवार त्यांच्या समर्थकांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून काय झाले असा सवाल करताना दिसत आहेत. सोमवारपर्यंत थांबा असा निरोप दिला जात आहे.
माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, पंढरपूरचे आमदार भारत भालके हेही मुंबईत असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत होते. त्यांच्या उपस्थितीत आमदारांचे प्रवेश होतील असे सांगितले जात होते. पण आमदारांनी राजीनामा न दिल्याने प्रवेश रखडला असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अॅड. मिलिंद थोबडे हेही मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पण शहा यांच्या दौºयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकली नाही असे सांगण्यात आले. दरम्यान, अॅड. थोबडे यांच्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.
आज ठरणार भवितव्य
- सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी सोमवारी राजीनामे दिले तर त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाला असे मानण्यात येत आहे. आमदारांच्या समर्थकांनी तसे कार्यकर्त्यांना निरोप दिले आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कोणत्या मतदारसंघातून कोण कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप-सेना युती होणार की नाही हे अद्याप निश्चित नसल्याने मतदारसंघातील लढतीविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे.