मास्क घालू... फिजिकल डिस्टन्सिंग पाळू पण पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 03:50 PM2021-02-23T15:50:22+5:302021-02-23T15:50:28+5:30
सोलापूरकर म्हणताहेत, पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा
सोलापूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यात काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातही पुन्हा लॉकडाऊन होईल की काय ? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. याबाबत नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी ‘पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा’, अशा प्रतिक्रिया दिल्या. मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळून प्रशासनाला सहकार्य करू, असे नागरिक सांगताहेत.
वाढत्या कोरोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा विविध कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. धार्मिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. लग्नसमारंभावरही प्रशासनाची विशेष नजर असणार आहे. लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास थेट मंगल कार्यालयावर कारवाई होणार आहे. मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. कोरोना तपासणीच्या संख्येत आता वाढ होणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लॉकडाऊन हा पर्याय नाही. अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. उद्योग क्षेत्रातला सुरळीतपणा पुन्हा विस्कळीत होऊ नये, याकरिता पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. रुग्ण वाढल्यास विभागनिहाय प्रतिबंध करा. निर्बंध घाला.
- राजेश गोसकी
अध्यक्ष-टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशन
यंत्रमाग उद्योगात कामगारांना मास्क बंधनकारक केला आहे. कामगारांना कारखान्यात प्रवेश देताना सॅनिटायझर केले जातेय. तसेच कारखान्यातून बाहेर पडतानाही त्यांना सॅनिटायझर केला जात आहे. आम्ही शिस्त पाळतोय. यापुढेही शिस्त पाळू. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको.
- पेंटप्पा गड्डम
अध्यक्ष-सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ
धार्मिक तसेच सार्वजनिक उत्सव पूर्णपणे बंद करावेत. प्रत्येक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक करावेत. जे नागरिक नियम पाळत नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी. याकरिता प्रशासनाने पुढाकार घ्यावा. आम्ही शिस्त पाळू. परंतु़ पुन्हा लॉकडाऊन नको.
- श्रीनिवास ईट्टम, उद्योजक
- एकूण कोरोना रुग्ण - ५२४५६
- बरे झालेले रुग्ण - ४९८१६
- कोरोना बळी - १८२७