पांडुरंगाला थंडी वाजू नये म्हणून उबदार पोशाख परिधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:51+5:302020-12-06T04:23:51+5:30
पंढरपूर : सध्या राज्यात कडाक्याची थंडी सुरू आहे. ज्याप्रमाणे या मोसमात थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी सर्वसामान्य उबदार कपड्यांचा वापर ...
पंढरपूर : सध्या राज्यात कडाक्याची थंडी सुरू आहे. ज्याप्रमाणे या मोसमात थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी सर्वसामान्य उबदार कपड्यांचा वापर करतात, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचा देव असलेल्या विठ्ठलाचे संरक्षण व्हावे. यासाठी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून देवाला उबदार कपड्यांचा पोशाख परिधान करण्यात आला आहे.
थंडीपासून संरक्षण होण्यासाठी कार्तिकी यात्रेनंतरची प्रक्षाळपूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून देवाला उबदार कपड्यांचा पोशाख सुरू करण्यात येतो. रोज रात्रीच्या १० वाजता शेजारतीदरम्यान देवाला उबदार पोशाख घालण्यात येतो. यावेळी देवाला १०० हात लांबीचे पागोटे बांधले जाते. त्या पागोट्यावर कानपट्टी बांधली जाते. त्यानंतर देवाच्या खांद्यावर शेला घालण्यात येतो. शेल्यावरून शाल घालण्यात येते. शालीवरून रजई पांघरली जाते. त्यानंतर देव निद्रेला जातो. पहाटे पाचच्या नित्य पूजेदरम्यान पागोटे, रजई काढून देवाला कानपट्टी व शाल पांघरण्यात येते. आठच्या पूजेदरम्यान कानपट्टी व शाल काढण्यात येते. त्यानंतर देवाला नेहमीप्रमाणे इतर पोशाख परिधान करण्यात येतात. हा नित्यक्रम माघ महिन्याच्या वंसत पंचमीपर्यंत असल्याचे विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
-----
फोटो :०५विठ्ठल०१,०२
श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेला उबदार कपडे घालण्यात आले आहे.