चारनंतर अचानक हवामान बदललं, वादळी वावटळासह सोलापूर जिल्ह्यात पाऊस
By Appasaheb.patil | Published: June 4, 2023 07:45 PM2023-06-04T19:45:12+5:302023-06-04T19:45:18+5:30
वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
सोलापूर : बळीराजाला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अखेर रविवारी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली. गत काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा सोसणाऱ्या सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दुपारी चारनंतर हवामानात अचानक बदल झाला.. वारे जोरात वाहू लागले अन् सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरासह जिल्ह्याला वाढलेल्या तापमानानं हैराण केले होते. उकाड्याने व वाढलेल्या तापमानाच्या पारामुळे सोलापूर हैराण झाले होते. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४१ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. हे तापमान मागील पंधरा दिवसांतील कमीच होते. रविवारी दुपारी चारनंतर वारे जोरात वाहू लागले. याचवेळी ग्रामीण भागात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा जाणवत होता. पाचनंतर ढगांच्या प्रभावामुळे वातावरण हलके ढगाळ होते. त्यानंतर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत रिमझिम पाऊस पडला. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. हवामान खात्यानुसार, विदर्भात आता पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता..
भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. आकाश ढगाळ, गडगडाटासोबत विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शिवाय सोसाट्याचा वाराही मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचेही सांगितले आहे.