सौभाग्याचं लेणं सावकाराकडे गहाण ठेवून विडी कामगार हाकताहेत संसाराचा गाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:25 PM2020-06-08T12:25:12+5:302020-06-08T12:27:28+5:30
सराफांकडेही दिली जातेय मोड : पोटाला चिमटे देऊन काढले लॉकडाऊनचे दिवस
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून विडी कारखाने बंद आहेत. यामुळे महिला विडी कामगारांची रोजीरोटी बुडाली. कामगार पोटाला चिमटे देत दिवस ढकलताहेत. त्यांची आर्थिक विवंचना थांबता थांबेना. उद्योग सुरू करायला शासनाकडून परवानगी मिळाली. पण प्रशासकीय नियमावलीच्या अडचणीमुळे विडी कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे कामगारांनी धास्ती घेतली आहे. हातावर पोट असणाºया या कामगारांच्या घरी चुली पेटेनात. त्यामुळे खाजगी सावकारांपुढे ते हात पसरवतायेत. तर बहुतांश महिला आपलं सौभाग्याचं लेणं (मंगळसूत्र) गहाण ठेवून संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करताहेत.
पाच जूनपासून सराफ दुकाने झाली आहेत. सराफ दुकानांसमोर काही महिलांची गर्दी दिसते. या महिला गुपचूपपणे आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून व्याजदरात कर्ज काढताहेत. तर काही महिला कामगार आपले इतर दागिने मोडताहेत. अशोक चौक येथील रहिवासी असलेल्या पार्वतीअम्मा बँक आॅफ इंडिया समोरील एका सराफ दुकानात शनिवारी दुपारी बराच वेळ बसून होत्या. तेथे येण्याचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी घरची परिस्थिती कथन केली. त्यांना तीन मुली आहेत.
लॉकडाऊनमुळे यंत्रमाग कामगार असलेला नवरा सुद्धा घरातच बसून आहे. अडीच महिन्यांपासून एक रुपयाची कमाई नाही. मग घर चालणार कसं ?. घरात असलेला एकमेव दागिना अर्थात त्यांचं सौभाग्याचं लेणं मणी मंगळसूत्र ते गहाण ठेवायला दुकानात आल्याचे त्यांच्या बोलण्यावरूनच कळाले. त्या दुकानात बसलेल्या होत्या. त्यांना त्यांचा फोटो काढू का ?असे विचारले असता त्यांनी हात जोडून नकार दिला. पूर्वभागात अशा अनेक पार्वतीअम्मांच्या व्यथा चव्हाट्यावर येत आहेत. लवकरात लवकर कारखाने सुरू होऊन त्यांच्या चुली पेटतील , अशी आशा हजारो महिला कामगार बाळगून आहेत. कारखाने काही सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे त्याच्या समोर अंधार पसरला आहे.
पोटाची खळगी भरता येईना...
- साईबाबा चौकातील महिला विडी कामगार वसुंधरा दामोदर येथे सांगतात, त्यांना चार मुली आहेत. त्यांना स्वत:चं घर नाही. ते भाड्याच्या खोलीत राहतात. लॉकडाऊनमुळे पोटाची खळगी भरता येईना. तिथे घर भाडे कुठून आणू दे. घरचा गाडा हाकण्यासाठी महिन्याकाठी पाच हजार रुपये लागतात. विडी कारखान्याकडून फक्त हजार रुपये अनामत रक्कम मिळाले. त्यामुळे पोटाला चिमटे देण्याशिवाय पर्याय राहत नाही. काही दिवस चुल पेटवली नाही. यापूर्वी घरच्या अडचणीमुळे कर्ज काढले. ते खर्च फेडता येईना. आता पुन्हा कर्ज काढण्याची स्थिती आमच्यावर उद्भवली आहे.