सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवर भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:04 PM2018-10-15T13:04:21+5:302018-10-15T13:05:37+5:30
अधीक्षक अभियंत्यांची माहिती: विजेच्या मागणीत वाढ, निर्मितीत घट
अप्पासाहेब पाटील
सोलापूर : कोळशाचा तुटवडा, पाणी वापरावर आलेले निर्बंध यामुळे राज्यातील वीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणात घट झाली़ यामुळेच महावितरण प्रशासनाला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागत आहे़ सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवरून पहिल्या तासापेक्षा २ तास अधिकचे भारनियमन करण्यात येत असल्याची माहिती सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, अकलूज, पंढरपूर, बार्शी असे पाच विभाग येतात़ या पाच विभागांतर्गत जिल्ह्यात २५४ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत़ त्यात १३६६ फिडर्स आहेत़ त्यापैकी २१८ फिडर्स शेतीपंपांचे आहेत़ आॅक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा व पाण्याची कमतरता जाणवत असल्याने भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणने सांगितले़ सोलापूर जिल्ह्यातील ज्या भागात वसुली कमी आहे व वीज गळती जास्त त्या भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत असल्याचेही सांगितले.
शहरात भारनियमन नाही... पण
- सोलापूर शहरात महावितरणकडून कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात येत नाही़ मात्र ज्या भागात लाईन बंद होणे, स्मार्ट सिटीच्या कामासाठी बंद करणे, तारा तुटणे, शॉर्टसर्किटने वायर जळणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे, महावितरणकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात आदी प्रकारांमुळे त्या त्या भागातील वीज काही काळासाठी बंद करण्यात येत असते़ त्यामुळे ग्राहकांना वाटते की, भारनियमन सुरू झाले की काय? पण शहरात कुठेही भारनियमन नसल्याचेही स्पष्टीकरण ज्ञानदेव पडळकर यांनी दिले़
सोलापूर जिल्ह्यात फक्त शेतीपंपांवरील जोडणीवर भारनियमन करण्यात येत आहे़ ज्या भागात ४० टक्के विजेची हानी आहे, जिथे वसुली कमी आहे, त्याच भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत आहे़ हे भारनियमन थोड्या काळासाठी असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे़
- ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, सोलापूर
वीज गळती ४० टक्क्यांवर पोहोचली
महावितरणच्या मुख्य तारेवर आकडा टाकणे, अनधिकृत वीजजोडणी, हुक टाकणे, मीटर डायरेक्ट करणे, मीटरमध्ये पट्टी टाकणे, मीटरमध्ये छेडछाड करून चुकीचे रीडिंग दाखविणे, मीटर बंद पाडणे यांसारख्या चुका करून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होती़ सोलापूर जिल्ह्यात तांत्रिक, वाणिज्य असे गृहीत धरून ४० टक्के वीज गळती होत असल्याची माहिती महावितरणने सांगितली.