लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी आलेल्या पालख्यांचे इसबावीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:15+5:302021-07-20T04:17:15+5:30
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या पालख्यांचे स्वागत करण्याची परंपरा श्री संत नामदेव महाराजांकडून जपली जात आहे. कोरोनामुळे मागील गतवर्षी ...
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या पालख्यांचे स्वागत करण्याची परंपरा श्री संत नामदेव महाराजांकडून जपली जात आहे. कोरोनामुळे मागील गतवर्षी आणि यावर्षी पंढरपूर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी आणल्या जात आहेत. यंदाही एसटीने आलेल्या मानाच्या पालख्यांचे स्वागत करण्यासाठी पंढरपूरचे वतनदार श्री संत नामदेव महाराजांची पालखी सायंकाळी पाचच्या सुमारास एसटीने इसबावीकडे रवाना झाली. या एसटीचे सारथ्य योगीराज कुलकर्णी व प्रशांत इंगळे यांनी केले. यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी या पालखी मार्गावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण मुक्त उधळण केली.
वाखरी येथील पालखी तळावर आलेल्या रुक्मिणी माता (कौडन्यपूर, अमरावती), संत एकनाथ महाराज (पैठण, औरंगाबाद), संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर, नाशिक), संत सोपानदेव महाराज (सासवड, पुणे), संत चांगाटेश्वर महाराज (सासवड, पुणे), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर, जळगाव), संत तुकाराम महाराज (देहू, पुणे), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी, पुणे), संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर, अहमदनगर), संत नामदेव महाराज (पंढरपूर, सोलापूर) या संतांच्या पालख्यांचे स्वागत श्री संत नामदेव महाराजांचे वंशज माधव नामदास महाराज यांनी केले.
-----
चोख पोलीस बंदोबस्त
मानाच्या संताच्या पालख्या इसबावीत आल्यावर संतांच्या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी चारीही बाजूने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. बाजूच्या रस्त्यावर बॅरेकेडिंग करण्यात आले होते. ज्यांच्याजवळ पास आहे, अशा लोकांनाच प्रवेश देण्यात आला.
----
चालकांनी स्वतःच्या पैशाने सजवली बस
राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारामध्ये एसटीचे चालक योगीराज नारायण कुलकर्णी व चालक प्रशांत इंगळे यांना श्री संत नामदेव महाराजांची पालखी एसटीने इसबावी येथे नेण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे त्या दोघांनी स्वतःच्या पैशाने एसटी बस फुलांनी सजविलेली आहे. गेली दहा वर्षांपासून ते विठुरायाची मनोभावे सेवा करतात.
-----
आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्यासाठी पंढरपुरातून वाखरीकडे प्रस्थान करताना श्री संत नामदेव महाराजांच्या पादुका.