काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल... ओक्के मदी सगळं; शहाजीबापूंच्या ‘डोंगार’मुळे माणदेशी बोली जगभर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 08:32 AM2022-06-28T08:32:31+5:302022-06-28T08:33:20+5:30
शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं.
रवींद्र देशमुख -
सोलापूर: अहो, चर्चा तर होणारच! सांगोल्याच्या शहाजीबापूंनी जणू गुवाहाटीचं ‘डोंगार’च सर केलंय... माणदेशसारख्या कोरड्या भागातून आलेेल्या या शिवसेनेच्या रांगड्या आमदारानं आपल्या माणबोलीतून आसामची हिरवाई जगभर पोहोचवली... यानिमित्ताने ‘गदिमा’, व्यंकटेश माडगूळकर या दिग्गज लेखकांनी अक्षरवैभव दिलेल्या माणदेशी भाषेची चर्चा सुरू झाली. नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातील आर्ची ठसक्यात म्हणाली होती ना..‘मराठीत कळत नाय, तर इंग्लिशमध्ये सांगू का?’ ही करमाळा भागातील भाषा देशभर पोहोचली; पण शहाजीबापूंनी तर माणबोली जगभर पोहोचवली.
शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं. त्यांच्या त्या संवादाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे जसा माणदेशी रांगडेपणा उमजला तसं बंडामागचं खरं खरं कारणही मराठी जनतेला उमजलं. जशी ही ऑडिओ क्लिप जगभर गेली, तसे शहाजीबापूही गाजले.
सोशल मीडियावर जिकडे पाहावे तिकडे ‘काय झाडं, काय डोंगार...‘ओके’मध्ये आहे’ हे त्यांच्या संवादाचं पहिलं वाक्य अनेकांच्या वॉलवर झळकू लागलं. अनेक यू-ट्यूबर पत्रकारांनी बापूंच्या या ऑडिओमधील कन्टेन्टचा आधार घेऊन सध्याच्या राजकारणाचं विश्लेषण करणारे व्हिडिओ केेले. हजारोंच्या संख्येने लाईक्स अन् व्ह्यूज या व्हिडिओंना मिळत आहेत.
शहाजीबापू ज्या भागातून आलेत तो माणदेश हा सातारा, सांगली अन् सोलापूर जिल्ह्यातील माण नदीच्या खोऱ्याचा प्रदेश. पाण्याअभावी आलेला कोरडेपणा येथील माणसांच्या स्वभावात व भाषेवरही दिसून येतो. माणदेशी बोली जितकी रांगडी तितकीच आपुलकीची अन् प्रांजळ...
तिथली रम्यता भावली असेल!
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा इंगोले यांनी शहाजीबापू पाटील यांच्या संवादातील भाषा अन् भाव याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विवेचन केले. ते म्हणाले की, आमदारांचं अवघं आयुष्य माणदेशातील कोरड्या प्रदेशात गेलं. त्यांना तिथले डोंगर, झाडे आणि एकूणच रम्यता भावली. त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यातून आले. इथल्या भूप्रदेशाचा, वातावरणाचा परिणामही माणसाच्या वागण्या-बोलण्यात आलेला आहे. त्यामुळे भाषेचा लहेजा वेगळा वाटतो. माणदेशी बोलीभाषा इथल्या ग्रामीण महिलांमध्ये अधिक जाणवते. ‘वरलीकडून आला’, ‘खाललीकडं गेला’ अशी बोली सर्रास ऐकायला मिळते. माणदेशी बोलीवर सध्या संशोधन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाषेचा गौरव झाला!
सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शहाजीबापूंच्या बोलीची प्रशंसा केली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’मुळे करमाळा, जेऊरची भाषा देशभर पोहोचली. बापूंच्या मोबाईलवरील संवादामुळे बऱ्याच काळानंतर आमच्या भाषेला उजळणी मिळाली..या निमित्ताने सोलापुरी भाषेला गौरव प्राप्त झाला आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले आहे.