काय म्हणता.. आढिव, भटुंबरे शाळेतील जिल्हा परिषदेचे शिक्षकच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:20 IST2021-12-31T16:20:50+5:302021-12-31T16:20:56+5:30
मग काय शिक्षण अधिकाऱ्यांनीच घेतला वर्ग

काय म्हणता.. आढिव, भटुंबरे शाळेतील जिल्हा परिषदेचे शिक्षकच गायब
सोलापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शुक्रवारी सकाळी पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे व आढीव येथील शाळेला भेट दिली असता शिक्षकच गायब असल्याचे दिसून आले. मग काय, शिक्षणाधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला आणि एकाही मुलाला प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने सर्वजण अवाक् झाले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व गटशिक्षणाधिकारी नाळे हे गुरुवारी सकाळी आठ वाजता पंढरपूर तालुक्यातील आढिव येथील शाळेवर हजर झाले. शाळेत मुले आली होती पण शिक्षकच गायब होते. या शाळेमध्ये अकरा शिक्षकांची नेमणूक आहे. एक जण रजेवर तर एक जण आजारी होता, तर विद्यार्थी शाळा स्वच्छ करीत असताना दिसून आले. शिक्षणाधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगून विद्यार्थ्यांना वर्गात बसायला सांगितले व त्यांचा पाठ घेण्यास सुरुवात केली नऊ वाजेनंतर एक एक करीत शिक्षक वर्गात दाखल झाले. शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांची हजेरी घेतली. शाळेची अशी दुरावस्था केल्याबद्दल मुख्याध्यापक रोकडे यांचा शिक्षणाधिकारी लोहार यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
त्यानंतर जवळच असलेल्या भटुंबरे जिल्हा परिषद शाळेलाही भेट देण्यात आली. तेथेही नियुक्तीला असलेले तीन शिक्षक गैरहजर दिसून आले. या शाळेतील शिक्षकांनी रजा, नोंदवहीत खाडाखोड केल्याचे दिसून आले. शाळांच्या या स्थितीबद्दल शिक्षणाधिकारी लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना कल्पना दिली व सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावत असल्याचे सांगितले.