काय सांगता; सोलापूर शहरातील ब्लॅक स्पॉट वाढले अन् ग्रामीणमधील झाले कमी
By Appasaheb.patil | Published: October 14, 2022 06:29 PM2022-10-14T18:29:58+5:302022-10-14T18:30:06+5:30
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना
सोलापूर : जिल्ह्यात अपघातात मरणारे, गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. मात्र याबरोबरच जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. उर्वरित अपघातप्रवण क्षेत्रात आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शंभरकर बोलत होते. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अनिल विपत, रोहित दुधाळ यांच्यासह समितीमधील सदस्य उपस्थित होते.
शंभरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात ५५ अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) होते ते आता २३ वर आले आहेत. शहरातील २१ ब्लॅक स्पॉटचे २९ झाले आहेत. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी आय रॅडचा ॲपचा वापर वाढवा. अपघात हे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होतात. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने महामार्गावरील सर्व वळण रस्ते, प्रवेश, मोक्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. रस्त्यावर अपघात घडल्यानंतर सर्व विभागाची यंत्रणा ४८ तासांच्या आत पोहोचून अपघात घडल्याचे कारण जाणून घेतात. पुन्हा त्याठिकाणी अपघात घडू नये, यासाठी कार्यवाही करतात. मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना त्वरित मदत पोहोचली तर त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणून सर्व विभागाच्या सहकार्याने यंत्रणा उभी करायला हवी. अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्यासाठी मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून काम करावे.
महामार्गावर वळणाच्या ठिकाणी आणि गतीरोधकावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावाव्या. महामार्गावर नो पार्किंग झोन, लेन बदलणेबाबत जागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. रस्ते दुरूस्ती आणि इतर कामे सुरू असलेल्या ठिकाणी अपघात होत असल्याने कामापासून दोन-तीन किमीपासूनच सूचना फलक लावावेत, असेही त्यांनी सांगितले.
साखर कारखान्यांचा गळित हंगाम सध्या सुरू होत आहे. यामुळे सर्व साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर, बैलगाडी, ट्रक या वाहनांना लाल रंगाचे रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचनाही शंभरकर यांनी केल्या. गायकवाड यांनी रस्ते सुरक्षेबाबतची माहिती दिली.