काय सांगता; आरटीओत मिळतो असा नंबर की ती गाडी कोणीच नाही अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 PM2021-12-29T17:00:39+5:302021-12-29T17:00:45+5:30

६० नंबर फॉर्म भरा : इतर राज्यांत गेला तरी टॅक्सची नाही कटकट

What do you say The number you get in RTO is that no one will stop the vehicle | काय सांगता; आरटीओत मिळतो असा नंबर की ती गाडी कोणीच नाही अडविणार

काय सांगता; आरटीओत मिळतो असा नंबर की ती गाडी कोणीच नाही अडविणार

Next

सोलापूर : आरटीओकडून वाहनांसाठी भारत (बीएच) या नावाने क्रमांकांची सिरीज सुरू करण्यात आली आहे. हा नंबर घेतल्यानंतर राज्यात कुठेही राहण्यास गेल्यावर नंबर बदलण्याची गरज नाही व त्या राज्याचा टॅक्सही भरायची कटकट राहिलेली नाही; पण असा नंबर घेण्यासाठी ६० नंबरचा अर्ज भरावा लागणार आहे.

केंद्रीय कर्मचारी व ज्या खासगी कंपन्यांची तीन राज्यांत कार्पोरेट कार्यालय आहेत अशांच्या वाहनांसाठी बीएच नावाने सुरू होणारा नंबर मिळणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहने खाजगी व परिवहन संवर्गात नोंदणी करताना एकदाच टॅक्स भरावा लागणार आहे. रेल्वे, टपाल, दूरसंचार, लष्कर, केंद्रीय राखीव बल, सीमा सुरक्षा बल, नेव्ही, राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या होत असतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलून गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलावी लागते. यासाठी किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी वाहन नोंदणी केली आहे, त्या कार्यालयातून ट्रान्सफरचा अर्ज सादर करून आरटीओची एनओसी घ्यावी लागते. यासाठी संबंधित पोलिसांचा नाहरकत दाखला घ्यावा लागतो. उर्वरित टॅक्स रिटर्न घेऊन ज्या राज्यात जावे लागते, तेथील टॅक्स भरून वाहनांची नोंदणी करावी लागते; पण आता बीएच सिरीजमध्ये एकदा नंबर घेतल्यावर देशात कोणत्याही राज्यात गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलाची गरज नाही.

असा असतो हा नंबर

बीएच सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवर सुरुवातीला गाडीच्या नोंदणीचे वर्ष, त्यानंतर बीएच व गाडीला मिळालेला क्रमांक आणि शेवटी वाहनाच्या नंबरच्या सिरीजची मुळाक्षरे असणार आहेत. सध्या आपल्याकडे जिल्ह्यानुसार एमएच व कोड (१३) अशा नंबरप्लेट अस्तित्वात आहेत. त्यामुळे वाहन कोणत्या राज्यात नोंदणी झाले आहे, हे ओळखता येते.

बीएच सिरीजसाठी काय करावे लागणार

१बीएच सिरीजमध्ये जर तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकीचा नंबर हवा असेल तर आरटीओच्या वाहन वेबसाइटवर डीलरकडून ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. वाहनाच्या किमतीवरून आरटीओ कार्यालयाकडून कर आकारला जाईल.

२ पत्त्याच्या पुराव्यासाठी पॅन, आधार, बँक पासबुक याबरोबरच केंद्रीय कर्मचारी असल्याचे संबंधित खात्याने दिलेले ओळखपत्र जोडणे बंधनकारक आहे. यासाठी ६० नंबर फॉर्म भरणे बंधनकारक आहे. यावर संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्याची सही व शिक्का आवश्यक आहे.

आरटीओ कार्यालयात सुरू झाली नोंदणी

बीएच वाहन क्रमांकासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी वाहन विक्रेत्यांकडूनच कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाणार आहे. ज्यांना हा क्रमांक हवा असेल त्यांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. आरटीओ कार्यालयाकडून अर्जाबाबत खातरजमा केली जाईल. त्यानंतर संबंधितांना भारत या सिरीजमधून क्रमांक दिला जाईल. कोणत्याही राज्यात गेल्यावर हाच क्रमांक कायम राहणार आहे.

वनटाइम टॅक्स भरता येणार

बीएच सिरीजमध्ये वाहन नोंदणी केल्यावर पंधरा वर्षांसाठी टॅक्स भरावा लागणार आहे. महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात बदली झाल्यानंतर हा नंबर किंवा दुसऱ्या आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी करण्याची गरज नाही. एमएच १३ अशी नोंद असलेल्यांना कर्नाटकात राहावयास गेल्यावर नंबर बदलून घ्यावा लागतो, अन्यथा वाहतूक पोलीस वाहन अडवू शकतात.

केंद्रीय कर्मचारी व तीन राज्यांत कार्पोरेट बिझनेस असलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएच सिरीजमधून वाहनांना नंबर घेता येणार आहे. बदली कर्मचाऱ्यांना दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहन पुनर्नोंदणीच्या कटकटीतून मुक्त करण्यासाठी केंद्रीय परिवहन विभागाने ही सोय केली असून, या सिरीजमध्ये नाेंदणी सुरू झाली आहे.

- अमरसिंह गवारे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: What do you say The number you get in RTO is that no one will stop the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.