काय सांगता; आपत्ती निवारणासाठी दोन कोटी साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंत्रालयात पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 06:08 PM2021-08-17T18:08:25+5:302021-08-17T18:08:34+5:30
स्मरणपत्र दिले, फोन केले, तरीही आपत्तीविषयी नाही गांभिर्य
सोलापूर : जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. आपत्ती निवारण साहित्य खरेदीसाठी दोन कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यानंतर वारंवार फोन केले. स्मरणपत्र पाठविले. तरीही मंत्रालयातून रिस्पॉन्स मिळत नसल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
पावसाळा सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना अद्याप पुराचा धोका आहे. अशा काळात आपत्ती निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला. प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला होती. याबाबत प्रशासनाने वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला. स्मरणपत्रही दिले. दोन वेळा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही फोन केले. आठ दिवसांत मंजुरी मिळेल. साहित्य खरेदीला तयारीला लागा, असे आश्वासनही मंत्रालयातून मिळाले. याबाबत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी प्रस्तावच आले नाही, असे सांगितले.
महिनाभरापूर्वी राज्यभरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४३ गावांमध्ये पूर आला. यावर्षी पुन्हा पूर निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला. आराखडा तयार करताना आपत्ती निवारण साहित्याची गरज निर्माण झाल्याने आपत्ती निवारण साहित्य खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यास अद्यापही मंजूरी मिळाली.
साहित्य खरेदीचा प्रस्ताव
- रेस्क्यू बोट-१३
- सर्चलाइट- २६
- लाइफ बॉय-६५
- मेगाफोन-२६
- फ्लोटिंग पंप-५
- ब्रीदिंग ॲप्रटरस-१३