काय सांगता राव...; बंद पिंजऱ्याला आमिष मिळेना; बिबट्या काही जेरबंद होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 04:21 PM2021-08-06T16:21:39+5:302021-08-06T16:21:44+5:30
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत.
सोलापूर : बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कोंडी गावालगत एक पिंजराही आणून ठेवला आहे. पण त्यात ठेवण्यासाठी आमिष नसल्यामुळे हा हिंस्त्रप्राणी अद्यापपर्यंत जेरबंद होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील बुधवारपासून कोंडी औद्योगिक वसाहतीलगतच्या ‘एलएचपी’ कंपनीसमोर बिबट्या दिसला होता. वन खात्याने पाऊलखुणांचे निरीक्षण करून बिबट्या असल्याची पुष्टी दिली. वनखात्याने बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा आणून ठेवला आहे. या पिंजऱ्यात बिबट्याला खाण्यासाठी आमिष (शेळी, बोकड व इतर) बांधून ठेवावे लागते. खाण्याच्या आमिषाने बिबट्या येईल व जेरबंद होईल, यासाठी हा पिंजरा आहे. वनखात्याने आणलेला पिंजरा गावालगतच्या गायकवाड वस्तीजवळ ठेवला आहे. यात आमिष ठेवण्यासाठी वनखात्याकडे पैसेच नाहीत का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण चार- पाच दिवसांखाली आणलेला पिंजरा बंद अवस्थेत आहे.
--
चौकट
शेळी केली फस्त
गुरुवारी रात्री कोंडी औद्योगिक वसाहतीलगत अकोलेकाटी हद्दीतील सोमनाथनगर येथील महादेव राठोड यांची शेळी फस्त केली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता बिबट्यानेच मुंडके तोडले असल्याचा संशय व्यक्त केला. वनखात्याचे कर्मचारी एकीकडे बिबट्यानेच शेळीचे मुंडके तोडले असावे असे सांगतात तर दुसरीकडे पिंजरा बंद ठेवला जातो.
---
चौकट
पृथ्वीराज मानेंची गस्त
सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक पृथ्वीराज दिलीप माने हे बिबट्या दिसलेल्या कोंडी, अकोलेकाटी, बीबीदारफळ गावात सायंकाळी गस्त घालत आहेत. थेट आडवळणाच्या दूरवरच्या वस्तीवरील कुटुंबांना रात्री भेटून धीर देत आहेत.
कोट
चार- पाच दिवसांपासून या भागात बिबट्या दिसला नाही. दररोज लोकेशन बदलत आहे. ज्या भागात दिसेल त्या भागात पेट्रोलिंग व जनजागृती केली जात आहे.
- जयश्री पवार
वन परिक्षेञ अधिकारी