काय सांगता; सोलापूर जिल्हा परिषदेत तानवडे, दराडे यांचा ‘रात्रीस खेळ चाले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:18 PM2021-03-13T12:18:36+5:302021-03-13T12:18:41+5:30

आरोप-प्रत्यारोप: ‘तेच’ डायरेक्टर असल्याचा धाईंजेंवर पलटवार

What do you say Tanwade, Darade's 'Ratris Khel Chale' in Solapur Zilla Parishad | काय सांगता; सोलापूर जिल्हा परिषदेत तानवडे, दराडे यांचा ‘रात्रीस खेळ चाले’

काय सांगता; सोलापूर जिल्हा परिषदेत तानवडे, दराडे यांचा ‘रात्रीस खेळ चाले’

Next

सोलापूर: झेडपीत आनंद तानवडे व मदन दराडे रात्री उशिरापर्यंतत थांबून अधिकाऱ्यांना वाचविण्याचे राजकारण करतात, असा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी केला आहे. तर रात्रीच्या मालिकेेचे धाईंजे हेच डायरेक्टर असल्याचे प्रतिउत्तर तानवडे व दराडे यांनी दिल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.

स्थायी सभेत अंगणवाडीतील पोषण आहारातील तथाकथित घोटाळ्याकडे त्रिभुवन धाईजे, उमेश पाटील, ज्याेती पाटील यांनी लक्ष वेधले होते. डिसेंबरमध्ये चौकशी समिती नेमली; पण अद्याप अहवाल आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर सदस्यांनी महिला बाल कल्याण अधिकारी जावेद शेख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरल्यावर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी चौकशी अहवाल येईपर्यंत पदभार काढण्याचे मान्य केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय फिरविला. यामागे तानवडे व दराडे यांच्याच हात आहे असा आरोप धाईंजे यांनी केला आहे. हे दोघे रात्री उशिरापर्यंत झेडपीत थांबतात व अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना हवे तसे निर्णय करायला लावतात. वास्तविक स्थायी सभेत झालेल्या निर्णयाशी दराडे यांचा काहीही संबंध नाही; पण तरीही हे दोघे रात्री उशिरापर्यंत थांबून असे खेळ करीत आहेत, असा आरोप धाईंजे यांनी केला.

माझ्याकडे अंगणवाडीला आहार पुरविण्यात गडबड झाल्याचे पुरावे आहेत असे म्हणत २०० पानी फाईल धाईंजे यांनी दाखविली. त्यामुळे महिला बाल कल्याण अधिकारी शेख यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही तक्रार चौकशीसाठी महिला बाल कल्याण आयुक्तांकडे पाठविल्याचे उत्तर दिले आहे. अंगणवाडीतील पोषण आहारच्या घोटाळ्याच्या चौकशी अहवाल त्वरित सादर करून शेख व जातीवाचक प्रकरणात माळशिरशचे बाल कल्याण अधिकारी लोंढे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आहे. या मागणीसाठी १५ मार्च रोजी झेडपीसमोर उपोषण करणार असून, पोलिसांना पत्र दिल्याचे धाईजे यांनी स्पष्ट केले.

रात्री लोकांची कामे करतो!

धाईंजे यांच्या आरोपाला उत्तर देताना तानवडे व दराडे यांनी रात्रीच्या मालिकेचे धाईंजे हेच डायरेक्टर असल्याचे म्हटले आहे. उशिरापर्यंत थांबून आम्ही लोकांची कामे करतो. याउलट आम्ही उघड केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी स्टे आणला आहे. शेख यांना आम्ही पाठीशी घातले नाही. अहवाल असेल तर कारवाई करावी, असे म्हणणे मांडले आहे.

Web Title: What do you say Tanwade, Darade's 'Ratris Khel Chale' in Solapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.