‘राज ठाकरेंना साहित्यातील काय कळते?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:46 AM2018-01-17T04:46:30+5:302018-01-17T04:46:40+5:30
समाजात जे काही घडते त्यावर साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे़ केरळ, तामिळनाडूतील साहित्यिक अशी भूमिका घेत असताना महाराष्ट्रातील साहित्यिक...
सोलापूर : समाजात जे काही घडते त्यावर साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे़ केरळ, तामिळनाडूतील साहित्यिक अशी भूमिका घेत असताना महाराष्ट्रातील साहित्यिक गप्प का, असा सवाल करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे हे वक्तव्य चुकीचे असून त्यांना साहित्यातील काय कळते, असा टोला बडोदा येथे होणा-या ९१ व्या अ़ भा़साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लगावला.
सांगली जिल्ह्यातील औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या गुपचिळी भूमिकेवर बोट ठेवले होते. त्यावर देशमुख म्हणाले, दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा सर्वप्रथम निषेध आपण व्यक्त केला होता. मी सातत्याने सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. त्यामुळे मराठी साहित्यिक भूमिका घेत नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे.
मराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा देशमुख यांनी निषेध केला. ते म्हणाले, इंग्रजी भाषेबाबत पालकांचा समज चुकीचा आहे़ दक्षिण भारतातील राज्यांमध्ये स्थानिक भाषा दैनंदिन व्यवहार, प्रशासकीय कामकाज आणि शिक्षणात सक्तीची आणि अनिवार्य केली आहे़ मग महाराष्ट्र सरकार असे का करत नाही? ही स्थिती अशीच राहिली तर येत्या १०-१२ वर्षात मराठी भाषा शिल्लक राहाणार नाही, अशी चिंताही देशमुख यांनी व्यक्त केली.