खरंच शिक्षण नेमकं कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:16 PM2019-07-26T12:16:05+5:302019-07-26T12:19:01+5:30

प्रश्न थोडासा गुळगुळीत वाटेल पण आज या विषयावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

What exactly is education for? | खरंच शिक्षण नेमकं कशासाठी ?

खरंच शिक्षण नेमकं कशासाठी ?

googlenewsNext
ठळक मुद्देजीवन जगण्याची कला शिकण्यासाठी शिक्षणाची गरज आहे गुणात्मक विकासासोबत गुणवत्तापूर्ण जीवन जगता यावं यासाठी शिक्षणाची गरज कर्तव्याला सेवेच्या पावित्र्याची सद्बुद्धी मिळण्यासाठी आज शिक्षणाची गरज

प्रश्न थोडासा गुळगुळीत वाटेल पण आज या विषयावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. शिक्षणाचा मूळ उद्देश आम्ही समजून घ्यायला हवा. खरंच शिक्षण नेमकं कशासाठी हा प्रश्न विचारला की नोकरीसाठी, काम मिळण्यासाठी, व्यवसाय कला शिकण्यासाठी, समाजात कसं वागावं हे कळण्यासाठी,वाचन, लेखन यावं यासाठी. अशी अनेक उत्तरे व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असू शकतात.

खरंच आज या प्रश्नाचे उत्तर शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी असावं. केवळ लिहिता वाचता आलं तर केवळ माहिती स्मृती पटलावर कोरुन ठेवणं सोपं होईल, प्राप्त ज्ञानाचा वापर करून जीवन आनंदमय जगण्याची कला यावी यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हावा पण आजची शिक्षणपद्धती व व्यवस्था गुणपत्रकावरील टक्क्यांमध्ये अडकल्याचे दिसून येते मग ते मिळवण्यासाठी वाट्टेल तो खटाटोप व धडपड चाललेली असते. शाळा, क्लास, व्यक्तिमत्त्व विकासाचे नानाविध छंदवर्ग, तसेच खेळांचे क्लब्स असे सारे प्रकार चाललेले असतात. सारासार विचार केल्यास स्पष्टपणे हाती फारसं काही लागताना दिसत नाही.

मुलांच्या पिढ्यान्पिढ्याचे लोंढे येत आहेत इतकंच नव्हे तर बहिस्थ शिक्षण माध्यमातून शिक्षण घेणाºयांची संख्याही तुलनेने अधिक दिसत आहेत केवळ पदव्यांनी पोट भरत नाही तर सोबत व्यवहार कुशलता ही जोपासण्याचं शिक्षण घ्यावे लागेल. पाठ्यपुस्तकातील विविध विषय, त्यातील संकल्पना या मुळातून समजून घ्याव्या लागतील. शब्दाशब्दांचे अर्थ जाणून घ्यावे लागतील. मुळापासून सारं केवळ विद्यार्थी न बनता ज्ञानार्थ बनून घेतलेलं शिक्षणच आम्हाला उपयोगी पडू शकतं. डॉ. जयंत नारळीकरांसारख्या अनेक महान लोकांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले म्हणून बाकी कुठेही अडथळा येत नाही तर मुलांच्या संकल्पना मातृभाषेतून अधिक स्पष्ट होतात, असंच अनेक विद्वानांनी विषद केलेले आहे. तरीही इंग्रजी सारख्या माध्यमातून शिक्षणाचा अट्टाहास करणं आजही प्रतिष्ठेचा मानलं जाते.

केवळ पुस्तकी टक्केवारीने १००% माणूस घडण्याची अपेक्षा करणं पूर्णत: चुकीचं आहे.  ज्ञानाला संस्काराची जोड कुटुंंबातून मिळणं गरजेचं आहे. नवी जीवनपद्धती क्षणिक आनंददायी बनवते. चिरंतन आनंदासाठी सातत्याने ज्ञान मिळवणे व जीवनात सार्थ उपयोजन करणं म्हणजे खरं शिक्षणं हे जाणीवपूर्वक कळावे यासाठी आज शिक्षणाची गरज आहे. जीवनात अनेकदा अनेक समस्या येऊ शकतात, प्रतिकूलता येऊ शकते अशावेळी तणावाचं व्यवस्थापन करताना उपयोगी व्हावं यासाठी शिक्षण घेण्याची गरज आहे.

एकदा रस्त्यावर भीक मागणारा आठ-दहा वर्षांचा मुलगा असेल. त्याला म्हटलं शाळेत चल तुला खायला, राहायला, वह्या-पुस्तकं सारं देऊ. तेव्हा तो म्हणाला शाळा शिकून कामाची काय गॅरंटी नाही. त्यापेक्षा मला रोज खाऊन शंभर दोनशे रुपये मिळतात. आम्ही पुढे म्हणालो ‘अरे तुला वेगवेगळ्या भाषा येतील त्याचे ज्ञान मिळेल’ तेव्हा तो म्हणाला ‘मला सध्या मराठी, हिंदी,कानडी व तेलुगू चार भाषा येतात एवढ्या भाषा तुम्ही नाही शिकवणार. मला माझं चांगलं आहे आणि गेला निघून. आम्ही सारे शिक्षक अवाक् झालो आणि प्रश्न उभा राहिला खरंच शिक्षण कशासाठी? केवळ शिक्षणानं पोट भरणार नाही हे आपणही समजून घ्यावं लागेल पण शिक्षणामुळेच कोणतंही पद आपण प्राप्त करु शकतो. तेवढा संयम प्रवास डोळसपणे करण्याची कला येण्यासाठी शिक्षण घ्यावे लागेल.

जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. गुणात्मक विकासासोबत गुणवत्तापूर्ण जीवन जगता यावं यासाठी शिक्षणाची गरज आहे. कर्तव्याला सेवेच्या पावित्र्याची सद्बुद्धी मिळण्यासाठी आज शिक्षणाची गरज आहे. व्यवहाराला नैतिकतेचा सुगंध लाभावा यासाठी शिक्षण हाच मूळ उद्देश शिक्षणाचा असायला हवा आहे. सेवाभाव असणारी माणसं तयार होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे.
- रवींद्र देशमुख
(लेखक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत) 

Web Title: What exactly is education for?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.