आषाढी यात्रेत भाविकांनी काय काळजी घ्यावी; जाणून घ्या नगरपालिकेने दिलेल्या सूचना
By Appasaheb.patil | Published: June 6, 2023 08:53 PM2023-06-06T20:53:00+5:302023-06-06T20:54:20+5:30
पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये. शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. नदीपात्रात, सार्वजनिक जागेत, अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये.
सोलापूर : आषाढ शुद्ध एकादशी २९ जून २०२३ रोजी आहे. ह्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा २२ जून ते दि. ६ जुलै या कालावधीत होणार आहे. यात्रेस येणाऱ्या यात्रेकरूंनी स्वच्छतेविषयक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
भाविक, यात्रेकरूंनी हे करू नये..
पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये. शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. नदीपात्रात, सार्वजनिक जागेत, अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये. उघड्यावर शौचविधी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदीपात्रामध्ये शौचास बसू नये किंवा नदीचे पात्र प्रदूषित होईल, असे कृत्य करणाऱ्याविरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम 115अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नदीमध्ये वाहने, जनावरे धुणे, कचरा टाकणे असे कृत्य करु नये.
चांगल्या आरोग्यासाठी हे नक्की टाळा..
यात्रेकरुंनी नदीचे, बोअरचे पाणी पिऊ नये, नळाचेच पाणी प्यावे, नासकी, कच्ची फळे खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये. कचरा कचरा पेटीतच टाकावा. सार्वजनिक रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कचरा न टाकता घंटागाडीकडे द्यावा. दशमी, एकादशी व द्वादशी या दिवशी घंटागाडी सकाळी व रात्री अशी दोन वेळा निघेल, याची घरमालक, मठाधिपती व नागरिकांनी नोंद घ्यावी. शहरातील नागरिकांनी आपली जनावरे मोकाट न सोडता बांधून ठेवावीत. मोकाट जनावरे व त्यांचे मालक यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकांनी व भक्तांनी झाकुन ठेवलेले व ताजे अन्नपदार्थ खावे. नदीचे पाणी पिवू नये. नगर परिषद टोल फ्री नंबर 18002331923 हा आहे.