मुख्यमंत्री आपला असून काय उपयोग; शिवसैनिक पेट्रोल भरायला महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 12:14 PM2022-01-17T12:14:36+5:302022-01-17T12:14:43+5:30
उत्तर तालुका शिवसेनेच्या बैठकीत व्यक्त झाली खंत
सोलापूर: आपला मुख्यमंत्री असूनही दोन वर्षांत काही उपयोग झाला नाही, कोणाला समिती नाही ना कसला आधारही नाही. शिवसैनिक पेट्रोल भरायलाही महाग आहेत, अशी खंत विभाग प्रमुख हुकूम राठोड यांनी व्यक्त केली. २५ वर्षांपासूनची शिवसैनिकांची ही परिस्थिती बदलण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली.
शिवसंवाद यात्रा व येत्या २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याबाबत उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडीच्या सरकारमध्ये तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामे व न्याय मिळत आहे. मात्र शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना कसलाच आधार नसल्याचे जाहीररित्या राठोड यांनी सांगितले. शिवसैनिकांनी गावपातळीवर सक्षम झाले पाहिजे. वरून कोणी काही देत नसते असे, यावेळी सांगण्यात आले. नान्नजचे शाखाप्रमुख प्रमोद गवळी यांनी रस्ता रुंदीकरणात शिवसैनिकांचे व्यवसाय बंद झाले, शिवसैनिक विस्तापित झालेय, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र वेगळा न्याय आहे. आमच्या पाठीमागे उभा रहा, अशी मागणी केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिले. बैठकीला जिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, तालुका समन्वयक वजीर शेख, तालुका प्रमुख शहाजी भोसले, उपतालुका प्रमुख संजय पौळ, माजी सभापती पांडुरंग पवार, युवा सेनेचे अजिंक्यराणा देशमुख, सदाशिव सलगर, प्रसाद निळ, श्रीकांत ननवरे, राजाराम कोलते, विष्णू भोसले, राजू घाटे आदीसह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
भावना व्यक्त
वरिष्ठांच्या, मुंबईच्या नेतेमंडळींच्या संपर्कात राहिले पाहिजे, तेथे आपल्या भावना पोहोचल्या पाहिजेत, असे म्हटल्यानंतर हुकूम राठोड यांनी हजारवेळा सेना भवनमध्ये भावना व्यक्त केल्याचे सांगितले.