काय, पाणी वाया जातंय? विद्यार्थी सांगणार उपाय; दीपगृह शाळा उभारतेय
By शीतलकुमार कांबळे | Published: February 26, 2023 10:35 AM2023-02-26T10:35:13+5:302023-02-26T10:35:51+5:30
जिल्ह्यात साकारताहेत दीपगृह शाळा
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : गाव किंवा शहरातील पाणी कशामुळे वाया जात आहे, यावर अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याचे काम जिल्ह्यातील विद्यार्थी करणार आहेत. यामुळे पाणी तर वाचेलच तसेच पर्यावरणाचे संवर्धनही होईल. या दृष्टीने जिल्ह्यात युनिसेफच्या साह्याने दीपगृह शाळा साकारत आहेत.
जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि आनंददायी पर्यावरण शिक्षण या उपक्रमाच्या अंतर्गत युनिसेफ, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे, एससीआरटी पुणे आणि युगंधर फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील १२०० शिक्षकांना हवामान बदल व आनंददायी पर्यावरण शिक्षण याचे प्रशिक्षण देण्यात आले. याच उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यातील दहा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दीपगृह शाळा म्हणून निवडण्यात आल्या आहेत.
दीपगृह शाळा पर्यावरण उपक्रम आणि हवामान बदल, पर्यावरण संरक्षण - संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडविण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न करतील. प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील दहा शाळांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. वाढते तापमान आणि हवामान बदल याचा मोठा फटका बालक आणि स्त्रियांच्या रोजच्या जीवनावर होत असतो याचा विचार करून युनिसेफ आणि इतर संस्थांच्या मदतीने हा उपक्रम महाराष्ट्रात नऊ जिल्ह्यांत राबविला जात आहे.
जिल्हा समन्वयक म्हणून प्रज्ञा कुलकर्णी या काम पाहतात, तर संतोष उकरडे, राहुल लोंढे, सुप्रिया माने, विजय कुचेकर हे समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत. या उपक्रमासाठी जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जाविर, डायटचे प्राचार्य कोरडे, प्रा. क्रांती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
हे होणार उपक्रम
जीवनजाळे, पाणी ऑडिट, ऊर्जा ऑडिट, शोषखड्डा तयार करणे, कचरा व्यवस्थापन, शाळेची जैवविविधता नोंदवही, परसबाग, पर्यावरण प्रतिज्ञा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या या शाळांचा समावेश
जिल्हा परिषद शाळा तेलगाव, येळेगाव, होनमुर्गी, बाणेगाव, नेहरूनगर, सोरेगाव, बोपले, तळे हिप्परगे, कोंडी, औज आहेरवाडी.