शेतकºयांच्या जमिनी जप्त करून काय विकास करणार ? आमदार भारत भालके यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:33 PM2018-03-06T18:33:43+5:302018-03-06T18:33:43+5:30
पंढरपूर तालुक्यातील शेतकºयांना जर आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर असल्या विकासाला आपला तीव्र विरोध निश्चित असेल, असा इशारा आ. भारत भालके यांनी दिला.
पंढरपूर : विकासाला आपला कदापि विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली शहरातील सर्वसामान्य नागरिक, तालुक्यातील शेतकºयांना जर आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर असल्या विकासाला आपला तीव्र विरोध निश्चित असेल, असा इशारा आ. भारत भालके यांनी दिला. शहराचा विकास सोडून ग्रामीण भागातील शेतकºयांच्या जमिनी जप्त करून काय विकास साधणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पंढरपुरातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पुढे आ. भारत भालके म्हणाले, प्रथम शहरालगतच्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कामाबाबात जमीन मालकांना नोटिसा न देताच, जागा ताब्यात घेण्यात येत आहे. झाडे तोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामात जमीन जाणाºया मालकांना चौपट भरपाई मिळावी; अन्यथा आंदोलन करणार आहे. शहरात प्राधिकरण, तुकाराम जन्मचतु:शताब्दी आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकासकामे केली जात आहेत.
जो विकास शहरातील नागरिकांची कवडीमोल दर देऊन घरेदारे उद्ध्वस्त करणार असेल तसेच तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनीचा कोणताही मोबदला न देता वाट लावणारा असेल तर अशा विकासाचा काय उपयोग? पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या संदर्भात नागरिकांच्या हरकतींच्या तारखा जिल्हा प्रशासनाकडून नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.
मुळात प्राधिकरणामध्ये पंढरपूर शहराचा, पालखी तळाचा, पालखी मार्गांचा विकास अपेक्षित आहे. मात्र तालुक्यातील ज्या विविध गावांचा शहरात भरणाºया यात्रांशी काहीही संबंध नाही त्या गावातील जमिनी विकासकामांच्या नावाखाली शेतकºयांकडून काढून घेतल्या जात असतील तर असला विकास काय कामाचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहरातील काही रस्त्यांचे रुंदीकरणदेखील केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याचा मध्य पकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समान अंतरावर मार्किंग करून त्याप्रमाणे रुंदीकरण अपेक्षित असते. मात्र रुंदीकरण करताना हा अपला, तो परका असा भेदाभेद करीत हेतुपुरस्सर काही विरोधी मंडळींना बाधित करून नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबरोबरच बाधित मालमत्ताधारकांना बाजारभाव अधिक चौपट दर अशा पद्धतीने मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी आ. भालके यांनी केली.
कचराकुंडीखाली हजारो अळ्या
- स्वच्छतेच्या नावाखाली प्रत्येक नागरिकाच्या खिशातून पैसे काढले जातात. मात्र शहरातील कचराकुंडीखाली हजारो अळ्या आहेत. विरोधी नगरसेवकांनी व्हिडीओ दाखविला तरी, प्रशासन याबाबत गंभीर नाही. चंद्रभागा नदीपात्रात मैलामिमिश्रित पाणी मिसळत आहे. चंद्रभागेतून वाळूचोरी होत आहे. मात्र प्रशासन नदीपात्रात म्हशींना बंदी घालणे, होड्यांना बंदी करण्यामध्ये गुंतले आहेत.
अधिकाºयांना सुनावले खडे बोल
शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे उपजिल्हा रुग्णालय आणि पालिका प्रशासनातील अधिकाºयांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी विविध शासकीय विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यासाठी संबंधित अधिकाºयांना आपण खडे बोल सुनावल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.