व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर एका वर्षाच्या मुलीला पाहतोय अन् घरच्यांशी संवाद साधतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:59 PM2020-04-23T12:59:10+5:302020-04-23T13:02:26+5:30
यूपी-बिहारमधील कामगारांच्या भावना; सोलापुरातील एमआयडीसीत शेकडो लोक अडकून
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : मी उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहे. मला एक वर्षाची मुलगी आहे. लॉकडाउनच्या एक महिना अगोदर गावी जाऊन मुलीचा चेहरा पाहिला होता. आता तिला फक्त व्हॉट्सअॅपवरच भेटतोय. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर मुलीची हालचाल विचारतोय आणि घरच्यांशी संवाद साधतोय. अधून-मधून घरच्यांचाही फोन येतो. मुलगी, पत्नी, आई-वडील आणि भावंड सगळे हजारो किलोमीटर लांब आहेत. तर मी सोलापुरातील फॅक्टरीमध्ये अडकून आहे. घरच्यांचा फोन आला किंंवा त्यांची आठवण झाली तरी जीव कासावीस होतो. डोळ्यात अश्रू साचतात, असे परवेज शेख सांगत होते.
परवेज शेख हे उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहेत. अक्कलकोट रोड येथील एमआयडीसीत कपाट तयार करण्याच्या मंगलगिरी या फॅक्टरीत ते काम करतात. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेश तसेच बिहार, मध्य प्रदेश येथील शेकडो मजूर सोलापुरात अडकून पडले आहेत. सर्वांची अवस्था परवेजसारखीच आहे. मजुरांच्या मालकांकडून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होत आहे. काहींना त्यांची व्यवस्था त्यांनाच करावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे जीवन बिकट होत आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड प्रांतातील गरीब व होतकरू कामगार अक्कलकोट रोड एमआयडीसी तसेच चिंचोळी एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. वेल्डिंग वर्क्स, लोखंडी फर्निचर, गादी फॅक्टरी तसेच इतर काही लघु उद्योगात काम करतात. लघु उद्योजकांकडून त्यांना मोठी मागणी असते. मंगलगिरी फॅक्टरीत फिरोज अहमद, मोहम्मद कैफ, अरमान अन्सारी मशरूप अन्सारी आदी जोनपूर येथील युवा कामगार काम करतात.
मोबाईलमध्ये बॅलन्स नाही..
- एमआयडीसी परिसरातील कारखान्यातच सर्व कामगार थांबून आहेत. एमआयडीसी परिसरातील बहुतांश दुकाने बंद असल्याने त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे होत आहेत. सर्वत्र कडक संचारबंदी असल्याने मोबाईल दुकानेदेखील बंद आहेत. त्यामुळे परप्रांतीय कामगारांना मोबाईल रिचार्ज करता येईना. त्यामुळे अनेकांना त्यांच्या परिवारातील सदस्यांशी मोबाईलवर संवाद देखील साधता येईना. त्यामुळे घरच्यांकडून फोन आल्यावरच आपल्या कुटुंबाची हालचाल विचारत आहेत.
आमच्या मंगलगिरी फॅक्टरीत बाहेरच्या प्रांतातील पाच कामगार काम करतात. या पाच मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आमच्याकडून होत आहे. या लोकांना गावाकडे जाण्याची प्रचंड ओढ लागून राहिली आहे. आमच्यासारख्या इतर फॅक्टरीमध्ये सुद्धा अनेक लोक परप्रांतीय कामगार अडकून आहेत. अडकून राहिलेल्या परप्रांतीय मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून झाल्यास खूप चांगले होईल.
- इस्माईल शेख, मंगलगिरी फॅक्टरी मालक