प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हील चेअर, रॅम्पची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:10 PM2019-04-02T12:10:05+5:302019-04-02T12:13:26+5:30
सोलापूर व माढा मतदारसंघातील ३४८० मतदान केंद्रांत देणार सुविधा
सोलापूर : मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना व्हील चेअरची सुविधा निर्माण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ३ हजार ४८0 मतदान केंद्रांत ही सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी झेडपी आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सरकारी दवाखाने, सेवाभावी संस्था व ग्रामपंचायतीकडून व्हिल चेअर मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मतदान केंद्रात रॅम्पची सुविधा निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जमादार यांनी दिली.
मतदानात दिव्यांगांचा सहभाग वाढावा, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना करण्यात आल्या आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ही जबाबदारी पूर्ण करून घेण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून डॉ. जमादार यांची नियुक्ती केली आहे.
मतदान केंद्राची संख्या, केंद्रातील दिव्यांग मतदारांची संख्या याबाबत माहिती जमादार यांनी निवडणूक कार्यालयाकडून मागविली आहे. ग्रामपंचायतींना पत्र पाठवून मतदानाप्रसंगी व्हील चेअरची सुविधा निर्माण करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. सेवाभावी संस्थांनाही याबाबत मदतीची अपेक्षा करण्यात येत आहे. यासाठी निवडणूक कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात येणार नाही.
दिव्यांगासाठी आवश्यक व्हिल चेअरची संख्या व आवश्यक रॅम्प किती आवश्यक आहे याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत नियोजन करून दिव्यांगांना या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती जमादार यांनी दिली.
सेवाभावी संस्थांची मदत ठरणार अडचणीची
- - दिव्यांगांना व्हील चेअर उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सेवाभावी संस्थांकडून ही सुविधा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे; मात्र अनेक सेवाभावी संस्था या राजकीय अधिपत्याखालीच असल्याने व्हील चेअरचा विषय वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- - व्हील चेअरवर कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींचा प्रचार होणार नाही याची दक्षता निवडणूक यंत्रणेला घ्यावी लागत आहे.