टमटमचं चाक थांबलं..पण गांडूळाने दिला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:38+5:302021-03-15T04:21:38+5:30
: कोरोनामुळे विद्यार्थी वाहन व्यवसाय बंद पडला. मग शांत बसून संसाराचा गाडा कसा हाकायचा, या विचारातूनच गांडूळ खत विक्रीचा ...
: कोरोनामुळे विद्यार्थी वाहन व्यवसाय बंद पडला. मग शांत बसून संसाराचा गाडा कसा हाकायचा, या विचारातूनच गांडूळ खत विक्रीचा व्यवसाय केला. सध्या रासायनिक खतापेक्षा गांडूळ खताला शेतकऱ्यांची मागणी आहे, हे लक्षात घेऊन याच व्यवसायाची निवड केली. या प्रकल्पाने त्यांना नवी वाट सापडली. महादेव ननवरे असे त्यांचे नाव आहे.
वडवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर महादेव यांची शेती आहे. मात्र, ती परवडत नसल्याने १७ वर्षांपूर्वी वडवळ येथून मोहोळकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्यातून शेतीसाठी भांडवल उपलब्ध झाले. गत वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे हा व्यवसायदेखील ठप्प झाला. गाडीची चाके थांबली अन यातून मिळणारे उत्पन्नही बंद झाले. एके दिवशी कामानिमित्त उपळाई, ता. माढा येथे गेल्यानंतर तेथील शेतात गांडूळखत दिसले अन् आपल्या शेतात गांडूळ खत प्रकल्प राबवून याच खत विक्रीचा व्यवसाय करण्याची कल्पना सूचली. शेतात स्वतःची जनावरे असल्याने शेणखताचा प्रश्न उद्भवला नाही. त्यामुळे सध्या झाडांच्या सावलीत गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. एक बेड गांडूळ खतासाठी साधारण २५०० रुपये खर्च येतो. त्यातून १ टन खत मिळते. यासाठी जागेवरच १० हजार रुपये मिळतात.
तसेच ५० किलोच्या पिशवीला ४५० ते ५०० रुपये मिळतात. बेडच्या तळाशी गांडूळ आपली विष्ठा, विसर्जन करतात. हेदेखील साठवून यापासून वर्मी वॉश हे द्रावण अवस्थेत खत तयार होते. ते २० रुपये लीटरने विक्री होते. खर्च वजा जाता २५ हजार रुपये नफा झाल्याचे महादेव ननवरे यांनी सांगितले. गांडूळ सुरुवातीला एकदाच विकत घ्यावे लागतात, पुन्हा इथेच त्यांची पैदास होते. त्यामुळे गांडुळाचा पुन्हा खर्च नाही. जनावरे घरचीच असल्याने शेणखतदेखील सहज उपलब्ध होते. त्यामुळे शेती करताना या व्यवसायाने आधार दिल्याचे त्यांचे बंधू केशव ननवरे यांनी सांगितले.
फोटो
१४वडवळ
गांडूळ खत प्रकल्पातील खत दाखविताना शेतकरी महादेव ननवरे.