निवडणूक आली अन् सारेच जागे झाले; मेळावे, कार्यक्रमांतून संवाद वाढू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:25 AM2021-08-27T04:25:47+5:302021-08-27T04:25:47+5:30

शिवानंद फुलारी अक्कलकोट : राज्य शासनाने नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांनी मेळावे ...

When the election came, Ansare woke up; Meetings, dialogues began to grow through the events | निवडणूक आली अन् सारेच जागे झाले; मेळावे, कार्यक्रमांतून संवाद वाढू लागले

निवडणूक आली अन् सारेच जागे झाले; मेळावे, कार्यक्रमांतून संवाद वाढू लागले

Next

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : राज्य शासनाने नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांनी मेळावे घेऊन उमेदवारांची चाचपणी घेणे सुरू केले आहे. अक्कलकोटच्या नगरपालिका निवडणुकीत भाजप, रासप, रिपाइं या महायुती विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

ही निवडणूक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे अस्तित्व ठरवणारी असेल. २३ ऑगस्टपासून प्रभाग, वॉर्ड रचना अशा कामांना प्रारंभ करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. यामुळे भाजपकडून नुकताच बूथ कमिटी मेळावा, रक्षाबंधन कार्यक्रमाबरोबरच उमेदवार चाचपणी सुरू केली आहे.

मुंबईचे आमदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी अक्कलकोटमध्ये येऊन निवडणुकीसंबंधी कानमंत्र दिल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसनेही जेऊर येथे मेळावा घेऊन वातावरण निर्माण केले आहे. एमआयएम, भारिप अशा काही पक्ष, संघटना स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अक्कलकोट नगरपालिकेवर अधिक काळ भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. याचे श्रेय जुन्या मुरब्बी नेत्यांना जाते. यंदा खेडगी परिवार वेगळी चूल मांडण्याच्या हालचाली दिसत आहेत. यामुळे आमदार कल्याणशेट्टी यांना पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक हाताळावी लागणार आहे.

सध्या विविध पक्षांमधील जुन्यांची गळती, नव्यांची भरती पाहता प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी महेश हिंडोळेंसारख्या अनुभवी नगरसेवकांना विश्वासात घेणे फायदेशीर ठरणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी पूर्वीच्या दिमतीने फिल्डिंग लावून आजी, माजी पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन जातीची समीकरणे जुळवणे सोयीचे होणार आहे.

------

खेडगींनी वेगळी चूल मांडल्यास मतांची विभागणी

अक्कलकोट शहर नेहमी भाजपच्या पाठीशी राहिलेले आहे. मात्र नगरपालिका निवडणुकीत उमेदवार फायनल करताना ज्या-ज्या वेळी नियोजन चुकले त्या-त्या वेळी फटका बसला आहे. त्याच धर्तीवर अनुभवींची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे. यंदा विद्यमान नगराध्यक्ष खेडगी यांनी वेगळी चूल मांडल्यास भाजपच्या मतांची विभागणी होऊ शकते. शिवाय काँग्रेसची महाविकास आघाडी झाली तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

----

आजी-माजींची प्रतिष्ठा पणाला

- नगरपालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, दुरावलेल्यांना जवळ करण्यासाठी विविध कार्यक्रमांवर भर दिला आहे. मागील वेळी काय चुकले याचा विचार करून रणनीती आखण्याचे नियोजन सुरू आहे.

---

Web Title: When the election came, Ansare woke up; Meetings, dialogues began to grow through the events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.