महत्त्वाचे प्रस्ताव असताना सोलापूर महापालिकेची सभा तहकुब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:19 PM2018-07-17T12:19:18+5:302018-07-17T12:20:13+5:30
कोरमचे कारण: एलईडीचा प्रस्ताव घेतलाच नाही
सोलापूर : महापालिकेच्या जुलै महिन्याच्या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर समांतर जलवाहिनीसह इतर महत्त्वाचे विषय असताना सभा कोरमअभावी तहकुब करण्यात आली.
महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा झाली. सभेला मोजकेच सदस्य उपस्थित असल्याने महापौर बनशेट्टी यांनी कोरमअभावी सभा तहकुब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. वास्तविक या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आहे.
उजनी धरण ते सोेलापूर अशी ११0 दसलक्ष लिटर क्षमतेची दुहेरी जलवाहिनी टाकण्याच्या ४४९ कोटीचा प्रस्ताव जीवन प्राधीकरणने तयार केला आहे. या योजनेच्या निधीबाबत ९ जुलै रोजी नगरविकास विभागाने पत्र दिले आहे. ही योजना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीतर्फे राबविण्यास मान्यता द्यावी असे सुचिवले आहे. त्यामुळे एनटीपीसीकडून मिळणारे २५0 कोटीचे अुनदान स्मार्ट सिटीकडे हस्तांतरीत करणे व स्मार्ट सिटी योजनेतून मिळणारे २00 कोटी अशा ४५0 कोटीतून ही योजना साकार करण्याचा नवा प्रस्ताव आहे. त्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी कंपनीमार्फत करणे व याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा हा प्रस्ताव आहे. तसेच प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत सोरेगाव येथील जागेवर संकुल उभारणे, नगरोत्थानमधील रस्ते व ड्रेनेजचे महत्वाचे प्रस्ताव निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.
शहरात एलईडी बसविण्याचा ठेका देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने निर्णय घेण्याकामी सभेकडे पाठविला होता. पण पुरवणीच्या विषय पत्रिकेत हा प्रस्ताव दाखल करण्यात आला नाही. प्रशासनाकडून सभेकडे निर्णय घेण्यासाठी पाठविलेले सुमारे १00 प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत माहिती देण्यात आली. याबाबत नगरसचिवांनी कल्पना दिली नसल्याचे स्पष्टीकरण महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले.
उशिराने आलेल्यांचा सह्या
सभेला २६ जण हजर असल्याचे हजेरी पुस्तकावरील सह्यावरून दिसून आले. पण यात काही उशिराने आलेल्या सदस्यांनी सह्या ठोकल्याचे दिसून आले आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे दीर्घ आजाराने उपचारासाठी पुणे हॉस्पीटलमध्ये दाखल असलेल्या सुरेश पाटील यांच्या नावापुढे सही करण्यात आल्याचे दिसून आले. गडबडीत क्रमवारी लक्षात न आल्याने विजयालक्ष्मी गड्डम यांच्याकडून पाटील यांच्या नावासमोर सही झाली आहे.