टोलनाके कधी बंद होणार ?

By Admin | Published: June 11, 2014 12:32 AM2014-06-11T00:32:45+5:302014-06-11T00:32:45+5:30

आमदारांनो लक्ष द्या : शहरातील रस्ते खराब; तरीही वाहनधारक देताहेत टोल

When will toll turn off? | टोलनाके कधी बंद होणार ?

टोलनाके कधी बंद होणार ?

googlenewsNext

सोलापूर:
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शहरात केलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले असताना चार ठिकाणी टोल द्यायचा कशाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मग सोलापूरबद्दल आवाज कोण उठविणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
याबाबत सोलापुरातील आमदारांकडेच लक्ष लागले आहे़ एमएसआरडीसीने टोलच्या माध्यमातून सुमारे ३० कोटींचा गल्ला जमा केला आहे़ कोल्हापुरात सोलापूर शहराच्या कितीतर पटीने रस्ते विकास महामंडळाने मजबूत आणि चांगले रस्ते केले, नियमानुसार कोल्हापूरकरांनी टोल दिलाच पाहिजे, असे असतानाही तेथील नागरिक टोलविरोधात रस्त्यावर उतरतात़ सोलापुरातील स्थिती मात्र विचित्र आहे़ एमएसआरडीसीने केलेले सर्व रस्ते खराब झाले आहेत़
एकाही रस्त्याचा टोल द्यावा अशी स्थिती नसताना सोलापूर-बार्शी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-होटगी आणि सोलापूर-देगाव या मार्गावर टोलवसुली गेल्या ८ वर्षांपासून सुरू आहे़ टोलवसुली एमएसआरडीसीकडे आणि देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे असा अजब करार मनपा आणि एमएसआरडीसीमध्ये झाला आहे़ दुसऱ्या टप्प्याचा पत्ता नाही, पहिल्या टप्प्यातील रस्ते अर्धवट आणि तेही उखडलेले असे असताना टोलवसुली सुरू आहे़ सध्या टोलनाक्यावर एईपी ही कंपनी टोल वसूल करीत आहे़
शहरात ९१़५० कोटींचा रस्ते प्रकल्प असताना अवघ्या ७८ कोटींचे रस्ते झाले़ १ जून २००६ पासून या रस्त्यावर टोलवसुली सुरू आहे़ शिवाजी चौक ते सम्राट चौक ते दयानंद महाविद्यालय, जुना बोरामणी नाका ते शांती चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक ते विजापूर रोड हा रिंगरुट रस्ता, रिपन हॉल ते पार्क चौक ते भैय्या चौकमार्गे कोयनानगर रस्ता, सरस्वती चौक ते होटगी रोड रस्ता, जुना पुणे नाका ते अवंतीनगर, मोदी पोलीस चौकी ते विजापूर रोड क्रॉस आणि बाळे गावातील मुख्य रस्ता हे रस्ते विकास महामंडळाने केलेले आहेत़
यातील एखादा रस्ता सोडला तर एकही रस्ता चांगला नाही. तरीही बाळे, अक्कलकोट रोड, सिद्धेश्वर कारखाना आणि देगाव येथे एमएसआरडीसीच्या वतीने टोलवसुली करण्यात येते़ हा टोल आणखी २१ वर्षे वसूल केला जाणार आहे़ याबाबत आता लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे़
-------------------------
टोल बंदची घोषणा; मात्र टोल सुरूच
शासनाने विधानसभेत राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये सोलापुरातील आठ टोलनाक्यांचा समावेश आहे़
मात्र मंगळवारी या ठिकाणी टोलवसुली सुरूच होती़ कुर्डूवाडी बाह्यवळण, मरवडे चेकपोस्ट, पंढरपूर-मोहोळ, सोलापूर-बार्शी, दुधनी नाका, करमाळा बाह्यवळण, कासेगाव टोलनाका आणि मांगी टोलनाका बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़
त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केली नाही़
सोलापुरात देगाव, बार्शी नाका, अक्कलकोट नाका आणि होटगी रोडवरील साखर कारखाना या चार ठिकाणी एमएसआरडीसीचे टोल नाके आहेत.
----------------------------
शहरातील एमएसआरडीसीकडून केलेले रस्ते अत्यंत खराब झाले असून त्याची देखभाल दुरुस्ती देखील केली जात नाही. त्यामुळे टोल कशासाठी द्यायचा? हा प्रश्न आहे़ मुख्यमंत्र्यांना बुधवारी भेटून हे टोल बंद करावेत, अशी मागणी करणार आहे़
- दिलीप माने
आमदार, दक्षिण सोलापूर

Web Title: When will toll turn off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.