लायटर दाबताच होतो "ठो" असा मोठा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:52+5:302020-12-09T04:17:52+5:30
जेऊर: गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात हैदोस माजवला आहे. तालुक्यातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. अशावेळी शेतातली कामेही ...
जेऊर: गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात हैदोस माजवला आहे. तालुक्यातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. अशावेळी शेतातली कामेही सुरळीत व्हावी अन् बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी कोर्टीच्या बळीराजाने जुगाड करीत टाकाऊपासून टिकाऊ, असे यंत्र बनवले आहे. या यंत्राद्वारे होणाऱ्या ‘ठो’ अशा आवाजानं हल्लेखोर बिबट्या दूर जाऊ शकतो, असा दावा गणेश अभंग या बळीराजानं केला आहे.
आतापर्यंत बहुतांश हल्ले हे नरभक्षक बिबट्याने शेतामध्ये केले आहेत. आतापर्यंत तीन व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे वस्त्यांवरील लोकांची धाकधूक आता वाढली आहे. त्यामुळे सबंध तालुका बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून सर्रास काठी आणि इतर साधनांचा वापर होत आहे; मात्र कोर्टी (ता. करमाळा) येथील शेतकरी गणेश अभंग यांनी बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून घरगुती टाकाऊ पाइप आणि फळ पिकवण्याच्या कार्पेटपासून ‘ठो’ आवाजाचं अनोखं अस यंत्र बनवलं आहे. शेतात उंच ज्वारीसारख्या पिकांना पाणी देताना हिंस्र प्राण्याच्या बचावासाठी या यंत्राचा नक्कीच फायदा होत आहे. सध्या ज्वारी आणि इतर सर्वच पिकांना पाणी देताना या यंत्राचा वापर करत असल्याचे गणेश अभंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. गणेश अभंग यांनी बनवलेल्या या देशी जुगाड यंत्राची तालुकाभर जोरदार चर्चा सुरू आहे.
-----नोकरीला असूनही शेतीशी नाळ
मुळात गणेश अभंग हे राज्य परिवहन महामंडळाच्या करमाळा आगारात चालक आहेत. शासकीय नोकरीला असले तरी त्यांनी शेतीशी असलेली नाळ जपून ठेवली आहे. लॉकडाऊनमुळे कामावर मर्यादा आली तरी त्यांनी शेतात लक्ष केंद्रित करून नेटाने शेती चालू ठेवली आहे.
----
सबंध तालुकाभर बिबट्याने धुडगूस घातल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शेतात पाणी देताना बिबट्यापासून बचाव करता यावा म्हणून हे घरगुती यंत्र बनवले. याचा मोठा आवाज होत असल्याने शेतात बसलेले हिंस्र प्राणी पळून जातात. म्हणून रोज शेतात काम करताना याचा वापर करतो आहे
- गणेश अभंग कोर्टी
छायाचित्र ओळी : ०८जेऊर-जुगाड
बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून गणेश अभंग यांनी बनवलेले यंत्र. ( छायाचित्र अक्षय आखाडे)
-----