सकाळी उठताच मिठाच्या गुळण्यांसोबत गुळवेल अन् दुधाचा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:11+5:302021-05-21T04:23:11+5:30
कोरोनामुळे होणारा त्रास कमी होण्यासाठी ग्रामीण भागात गावठी उपायावर भर दिला जात आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरीच ...
कोरोनामुळे होणारा त्रास कमी होण्यासाठी ग्रामीण भागात गावठी उपायावर भर दिला जात आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरीच तयार केलेल्या वनाैषधांची मात्रा घेतला जात आहे.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोणी देशी गाईचे गोमूत्र पितो, तर कोण मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या करतो. हे चित्र आता ग्रामीण भागात पहायला मिळू लागलं आहे.
काहीजण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून मिठाचे पाणीही पितात. त्यानंतर गुळवेल (अमृतवेल)चा काढा पित आहेत. सध्या अनेकांना गुळवेलची मात्रा चांगलीच लागू झाल्याचे सांगत आहेत. अनेकांनी साखरेऐवजी गुळाच्या चहाला पसंती दिली आहे. याचे किती फायदे अन् किती तोटे माहिती नाहीत मात्र गुळाचा चहा पिणे सुरू झाले आहे. संध्याकाळी देशी गाईच्या गरम दुधात हळद, लवंग, मिरेपुड टाकून पिण्यावर भर दिला जात आहे. याचे अनेक फायदे सांगितले जात आहेत. याशिवाय अनेक मंडळी सोशल मीडियावर येणारे उपाय करताना दिसत आहे.
---
गुळवेल ठरतेय अमृतवेल
लिंबाच्या झाडाला वेटोळा घालत वरती जाणारा वेल म्हणजे गुळवेल. अनेक वर्षांपासून शेतात अनेक झाडावर असलेली ही अमृतवेली औषधासाठी वापरली जाईल असे कोणाला वाटत नव्हते. मात्र कोरोनाच्या काळात गुळवेलचे महत्त्व चांगलेच वाढले आहे. गुळवेलच्या कांड्या, लिंबाच्या काड्या, तुळशीची पाने, जांभळीची कोवळी पाने व अर्द्रक एकत्रित बारीक केले जाते. ते रात्रभर पाण्यात टाकले जाते व सकाळी शिजवून चाळणीने गाळले जाते व ते बाटलीत भरून ठेवले जाते.
- दररोज सकाळी अर्धा कप पितात. शेणाच्या गोवरीच्या विस्तवावर हळद व ओवा टाकून त्याचा धूरही घेतला जात आहे. हा धूर फुप्फुसापर्यंत जाण्यासाठी श्वास ओढला जातो असं सांगितलं जात आहे.
- यातच हुलग्याचे माडगे खाल्ले तर शुगर असलेल्यांना चांगले आहे, असे सांगितल्याने आता चुलीवर माडगेही शिजू लागले आहे.
-----
मी सोलापुरातील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे उपचार घेत होतो. डाॅक्टर जगण्याची खात्री देत नव्हते. मी आई मयत झाल्याचे खोटे सांगून घरी आलो. दररोज गुळवेल, लिंबाच्या काड्या, तुळशीच्या पानाचा काढा घेऊ लागलो. गेली आठ महिन्यापासून दररोज गुळवेल काढा संपूर्ण कुटुंब घेत आहोत.
- बाळासाहेब पाटील कौठाळी, उत्तर सोलापूर