दम लागेपर्यंत हापसावं लागतं, तेव्हा भरते घागर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:52 AM2019-05-17T05:52:14+5:302019-05-17T05:52:30+5:30
गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.
- अशोक कांबळे
मोहोळ (जि. सोलापूर): वाड्या-वस्त्यांवर प्यायला पाणी नाही, ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे, त्यांच्या हातापाया पडून चार घागरी मागून घ्याव्या लागतात... इथे पाण्यासाठी भांडणे होतात, दम लागेपर्यंत अर्धा तास हापसावं तेंव्हा कुठं घागर भरते! असा आक्रोश होता खुनेश्वर गावातील ६५ वर्षांच्या सुभद्राबाई चव्हाण यांचा. गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.
मोहोळ शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकाचे मराठवाड्याच्या सीमेवर त्या काळात निजाम संस्थानाच्या ताब्यात असणाºया या गावात मक्याच्या पिकाची रास असायची. निजामांनी बांधलेल्या विहिरी गावात आहेत. शंभर वर्षे गावाला पाणीपुरवठा करायच्या, परंतु आज या सर्व विहिरी कोरड्या पडल्यात. आज पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयापाई हजारो रुपये किमतीची जनावरे विकण्याची वेळ गावकऱ्यांवर आली असून पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे.
तीन हजार लोकसंख्या असणाºया या गावात सातशे कुटुंबे आहेत. निजामाने पाडलेल्या विहिरीसह गावात व परिसरात १०० हून अधिक विहिरी आहेत, परंतु मागील वीस वर्षांपासून पाऊस कमी पडत चालल्याने त्या दिवसेंदिवस कोरड्या पडत गेल्या. आज तर सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. म्हणून ग्रामपंचायतीसह वाड्या-वस्त्यांवर लोकांनी बोअर घेतले आहेत.
गेल्या दोन महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा म्हणून ठराव दिला आहे, परंतु अद्याप गावाला टँकर मिळाला नसल्याचे माजी सरपंच चंद्रहार चव्हाण यांनी सांगितले.