नीरा, खडकवासलातून इंदापूरला तरतूद केलेलं ७.९ टीएमसी पाणी गेलं कुठं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:34+5:302021-05-27T04:23:34+5:30
कुरुल : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आजचा संघर्ष नव्हे, तर तो कै. सूर्यकांत आप्पा ...
कुरुल : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आजचा संघर्ष नव्हे, तर तो कै. सूर्यकांत आप्पा रणवरे यांच्या नेतृत्वाखाली १९७१ सालीच सुरू झाला आहे. त्यांच्या व समितीच्या संघर्षाची दखल घेऊन इंदापूरच्या ‘त्या’ २२ गावांसाठी नीरा डाव्या कालव्यातून ४ टीएमसी व खडकवासला धरणातून ३.९ टीएमसी असे एकूण ७.९ टीएमसी पाण्याची सणसर कटची स्थापना करून शासकीय अध्यादेश काढून तरतूद केली आहे. ते पाणी कुठे गेले, असा सवाल उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केला आहे.
या पाण्याची तरतूद मार्च १९९४ ला पूर्ण झाली आहे. मात्र बारामतीकरांनी इंदापूरकरांच्या ताटातील ही भाकरी ओढून आपल्या ताटात घेतली आहे. आता ते सोलापूरकरांची भाकरी इंदापूरकरांच्या ताटात ओढत असल्याचा आरोप करत खूपसे-पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेळगाव, अथुर्णे, शिरसटवाडी, निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, गोतोंडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी, चाकाटी, पिटकेव्वर, निमगाव - केतकी पिठेवाडी, लाखेवाडी, वडापुरी, काटी, भांडगाव, अवसरी या गावांच्या संबंधी हा पाण्याचा प्रश्न आहे.
या २२ गावांना बारमाही पाणी मिळावे यासाठी एका कृती समितीच्या माध्यमातून कै. सूर्यकांत आप्पा रणवरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन कृती समितीच्या माध्यमातून १९७१ पासून आंदोलने, रास्ता रोको, उपोषण करण्यास सुरुवात केली. अखेर शासनाने सूर्यकांत रणवरे व शेतकऱ्यांच्या संघर्षाची दखल घेऊन २० फेब्रुवारी १९८९ रोजी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना आठमाहीऐवजी बारमाही पाणी देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी संदर्भात अध्यादेशही काढला. मात्र, आज ५० वर्षांच्या काळानंतर हे त्या २२ गावांतील शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरले आहे.
---
२००९ ला बारामती सोडण्याचे हेच कारण होते
इंदापूरला पाणी देतो म्हणून तेथील शेतकऱ्यांना गंडविले. मात्र त्यांच्या हक्काचे आणि शासकीय अध्यादेश निघालेले ७.९ टीएमसी पाणी बारामतीकरांनी पळविले. त्यामुळे ‘त्या’ २२ गावांनी रास्ता रोको, उपोषण करून लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवारांनी तेथून पळ काढून माढा लोकसभा लढवली होती, असेही खूपसे म्हणाले.