Lok Sabha Election 2019; मी कुठं म्हटलंय की माढ्याचा मी उमेदवार : सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:51 PM2019-03-14T12:51:14+5:302019-03-14T12:53:27+5:30
मोडनिंब : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता त्यांच्या विरोधात तयारी करणारे भाजपाचे ...
मोडनिंब : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता त्यांच्या विरोधात तयारी करणारे भाजपाचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सर्वांना अचंबित करणारे उत्तर दिले आहे. त्यावरुनही उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
मोडनिंब (ता.माढा) येथील एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुभाष देशमुखांना माढ्यातील उमेदवारीबाबत आणि मागील काळात तुम्ही या भागासाठी नेमकं काय काम केले, असा प्रश्न विचारला असता देशमुख म्हणाले, मला असं वाटतंय मी असं म्हटलंच नाही की मी माढ्यात उभारणार आहे म्हणून.
साधारण संकेत असे असतात की ग्रामपंचायतीचे काम सरपंचाने करायचे असते. पराभूत झालेल्या उमेदवाराकडे कोणीही जात नाही कारण त्याच्याकडून काम होत नाही. पार्लमेंटमधील कामे खासदाराकडून अपेक्षित असतात. रस्त्यांची, रेल्वेची कामे खासदाराकडून अपेक्षित असतात. त्या लोकप्रतिनिधीचे काम असते की त्या भागातील जनतेच्या वेदना संसदेत मांडल्या पाहिजेत.
काल रात्री संजयमामांना मुख्यमंत्र्यांनी बोलावले, रणजितसिंह मुंबईत होते. भाजपाचे कार्यकर्ते त्यांचे काम करणार का?, असे विचारल्यावर देशमुख म्हणाले, भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करणार आहे. ज्याची तुम्ही नावे घेता ते कशासाठी मुंबईत गेले होते. हे त्यांनाच विचारा.
देशमुखांचा दौºयावर जोर
माढ्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात सुभाष देशमुखांचे करमाळा, माढा आणि सांगोला तालुक्यातील दौरे कायम आहे. भाजपाचे माढा तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी तर सहकारमंत्री सुभाष देशमुख हेच माढ्यातील उमेदवार असतील, असे सांगून टाकले आहे.