सोलापूर शहर ‘उत्तर’साठी कोठे यांना राष्ट्रवादीची ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 05:09 PM2019-09-29T17:09:43+5:302019-09-29T17:14:53+5:30
चर्चेला उधाण; पालकमंत्री म्हणाले, ‘कशाला मला ही नवीन डोकेदुखी ?’ कोठे म्हणाले, ‘मध्य’मधेच लढणार
राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूर शहर उत्तरसाठी पालकमंत्र्यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्यासाठी आता चक्क शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर दिली आहे. यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख अस्वस्थ झाले असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क साधून त्यांनी विनाकारण कशाला माझी डोकेदुखी वाढवताय अशी विचारणा केल्याचे सूत्राने सांगितले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तयारी केली आहे. अशात काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांनीही याच मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कोठे गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्या गटातील नगरसेवकांनी थेट मातोश्रीवर धाव घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. इकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने शहर उत्तरची जागा सोडण्याबाबत आग्रह केला. यासाठी स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह मान्य करीत शहर उत्तरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शविली. पण आता राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवीन पेच उभा ठाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास कोणीही उत्सुक नाही. माजी महापौर मनोहर सपाटे यांनी नेत्यांना फॅक्स करून आपल्या अडचणी मांडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील एका नेत्याने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात दुखावलेले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार महेश कोठे यांना आॅफर दिली आहे. शहर उत्तरमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात कोठे सरस ठरतील असा दावा या नेत्याने केला आहे. या मतदारसंघात कोठे यांचे जास्त नगरसेवक आहेत. त्याचबरोबर पूर्वी त्यांना पडलेल्या मतांचा विचार करता आता आणखी ताकद वाढणार आहे. पण कोठे यांनी सेनेकडून शहर मध्य मध्येच उमेदवारी मिळण्याची आशा असल्याचे सांगितले आहे. गेली पाच वर्षे याच मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे नव्याने धोका पत्करायचा कशाला असा सवाल उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर नवीन धोका पत्करण्यास नगरसेवक देवेंद्र कोठे, अमोल शिंदे यांनीही विरोध केला असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीने कोठे यांना आॅफर दिल्याची चर्चा पालकमंत्री यांच्या कानावर गेली. त्यावर त्यांनी मोहोळच्या नेत्याला संपर्क साधून मला नवीन डोकेदुखी कशाला करताय असा सवाल केल्याची चर्चा दिवसभर सोलापुरात रंगली आहे. कार्याध्यक्ष संतोष पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले शहर उत्तरची जागा आम्हाला सुटल्याचे अजून सांगण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही तसा फोन केलेला नाही,पण ही चर्चा आमच्याही कानावर आली आहे.
मला जिल्ह्याबाहेरील एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा फोन आला होता. पण मी नवीन धोका पत्करू शकत नाही. शहर मध्यमध्ये मला सेनेकडून उमेदवारी मिळणार आहे. तसे न घडल्यास अपक्ष लढण्याची माझी तयारी आहे.
- महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
शहर उत्तरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. इच्छुक असलेले मनोहर सपाटे यांनी अडचणी मांडून तसा फॅक्स केला आहे. त्यामुळे नवीन उमेदवारास आॅफर दिल्याने पालकमंत्री अस्वस्थ होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला संपर्क केल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे.
- चेतन नरोटे, नगरसेवक, काँग्रेस