कुठे सोन्याच्या हंड्यासाठी खोदला खड्डा; कोण पैशांच्या पावसासाठी मोजतो ८० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:40+5:302021-08-25T04:27:40+5:30
विठ्ठल खेळगी लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : कुठे सोन्याच्या हंड्यासाठी खड्डा खोदला जातो, कोण पैशांच्या पावसासाठी ८० हजार रुपये ...
विठ्ठल खेळगी
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : कुठे सोन्याच्या हंड्यासाठी खड्डा खोदला जातो, कोण पैशांच्या पावसासाठी ८० हजार रुपये मोजतो, कोण आजार कमी करण्यासाठी मांत्रिकाकडे जातो, पुत्रप्राप्तीसाठी भानामती करतात, म्हणून काही केले तरी लोकांच्या डोक्यातूनच अंधश्रद्धेचा भूत उतरेना झालंय. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाल्यानंतर आता अनेक संधिसाधू लोक उघडे पडत आहेत.
विज्ञानाने मोठी प्रगती केली. लोक चंद्रावर निघाले. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. असे असताना दुसरीकडे लोकांच्या डोक्यातून अंधश्रद्धा काही कमी होईना. शिकलेले लोकही मांत्रिकांच्या, बोगस सांधूंच्या भूलथापांना बळी पडत आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुवाबाजीचा पर्दाफाश कारण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. करणी, भानामती, मांत्रिकांच्या मंत्रोपचाराला बळी न पडता त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतल्यास लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेचे भूत निश्चितच उतरणार आहे.
...............
आठ वर्षांत ११२ तक्रारी दाखल, २४ प्रकरणे कोर्टात
........
भानामती करणारी चौथी पिढी
अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावात करणी, भानामती वर्षानुवर्षे चालत आलेली होती. तब्बल चौथ्या पिढीकडून हा प्रकार सुरू होता. आजार कमी होण्यासाठी, भूत घालविण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागत असे. कायदा अस्तित्वात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या मदतीने कोन्हाळीतील बुवाबाजीचा पर्दाफाश केला.
.............
शिक्षकही बुवाबाजीच्या जाळ्यात
केवळ अशिक्षित लोकच बुवाबाजीला बळी पडतात, असे नाही तर चक्क शिक्षकाने एका बुवाच्या जाळ्यात अडकला होता. पैशांचा पाऊस पाडतो, म्हणून एका बुवाने त्या शिक्षकाकडून तब्बल ७० ते ८० हजार रुपये घेतले. त्यानंतर बाहेरून काही बुवा येणार आहेत. आणखी एक विधी करायचा आहे, म्हणून त्या शिक्षकाकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर सलगरवस्ती पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला, तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचा हंडा असल्याचे सांगून एका महिलेला खड्डा खोदण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला होता.
..............
कायदा झाल्यामुळे अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. मात्र, जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत ही बुवाबाजी थांबणार नाही. मंत्रोपचाराने, करणी केल्याने कोणताच आजार बरा होत नाही.
- यशवंत फडतरे, प्रमुख, बुवाबाजी विभाग, अंनिस
............
२०१३ मध्ये झाला कायदा
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३, हा महाराष्ट्र राज्यातील एक गुन्हेगारी कायदा आहे. मुळात हा कायदा २००३ मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी तयार केलेला आहे. दाभोळकर यांच्या हत्येनंतर, २६ ऑगस्ट २०१३ रोजी हा कायदा पास झाला.