तिकिट कुठेय?; गणपतराव देशमुख यांच्याशी बसमध्ये कंडक्टरने घातली होती हुज्जत, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:31 PM2021-07-31T12:31:30+5:302021-07-31T12:31:53+5:30

सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Where's the ticket ?; The conductor had got into a fight with Ganapatrao Deshmukh in the bus. | तिकिट कुठेय?; गणपतराव देशमुख यांच्याशी बसमध्ये कंडक्टरने घातली होती हुज्जत, अन्...

तिकिट कुठेय?; गणपतराव देशमुख यांच्याशी बसमध्ये कंडक्टरने घातली होती हुज्जत, अन्...

googlenewsNext

सोलापूर: सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोटावरील शस्त्रक्रियेनंतर गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. आबासाहेब म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला परिचित होते.

शनिवारी सकाळी ६.३० वाजता सोलापुरातून त्यांचे पार्थिव पेनूर येथे आणून अर्धा तास तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तेथून पंढरपूरमार्गे सांगोला येथे पोहोचेल. सांगोल्यात पंचायत समिती कार्यालयापासून कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जयभवानी चौक, नगर परिषदेसमोरून नेहरू चौक, स्टेशन रोडमार्गे आणल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता सांगोला सूतगिरणीच्या पाठीमागील प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळविला. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.

प्रचंड साधी राहणीमान असलेले गणपतराव देशमुख विरळेच. नेहमी एसटीने फिरणाऱ्या गणपतरावांनी कधीच बडेजाव केला नाही. गणपतराव देशमुख अत्यंत साधे होते. मुंबईतील विधानसभेचं अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन ते प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच जायचे. २०१७मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनालाही ते एसटीनेच आले होते. ते कुठेही जायचे असेल तर एसटीनेच जायचे. 

एसटी प्रवासाचा नियम त्यांनी मोडला नाही. तो शिरस्ता त्यांनी कायम ठेवला. एकदा एसटीने प्रवास करत असताना त्यांना कंडक्टरने तिकीट विचारलं. त्यावर मी आमदार आहे, असं गणपतराव म्हणाले. आमदार आणि एसटीतून प्रवास करतोय? यावर कंडक्टरचा विश्वासच बसेना. त्याने गणपतरावांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. अखेर त्याने डेपोतील अधिकाऱ्यांना बोलावलं. अधिकाऱ्यांनी गणपतरावांना ओळखलं. त्यांची माफी मागितली अन् गणपतरावांचा प्रवास सुकर झाला होता.

एक झेंडा, एक पक्ष आणि एक मतदारसंघ-

१० ऑगस्ट १९२७ रोजी मोहोळ तालुक्यातील पिंपरी येथे जन्मलेल्या गणपतराव देशमुख यांनी ‘एक झेंडा, एक पक्ष आणि एक मतदारसंघ’ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत ५० वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९७२ आणि १९९५ चा अपवादवगळता ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात सातत्याने निवडून आले. १९७८ ते १९८० साली ते राज्याचे कृषी ग्रामविकास विधी न्याय खात्याचे मंत्री होते. त्यानंतर १९९९ ते २००२ या कालावधीत पणन रोजगार हमी या खात्याचे मंत्री होते. मार्च १९९०, नोव्हेंबर २००४, नोव्हेंबर २००९ साली त्यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

Web Title: Where's the ticket ?; The conductor had got into a fight with Ganapatrao Deshmukh in the bus.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.