बार्शीत बसमध्ये चढताना गंठण हिसकावून पळाला, गस्तीवरील पथकाने दोन तासात छडा लावला
By काशिनाथ वाघमारे | Published: November 11, 2023 04:47 PM2023-11-11T16:47:35+5:302023-11-11T16:48:19+5:30
ही घटना बार्शी बस स्थानकावर शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
सोलापूर : दिवाळीसाठी कोल्हापूर येथून माहेरी निघालेली महिला बार्शी बस स्थानकावर उतरून पाथरूड या एसटीत पिशव्या घेऊन चढत असताना तिच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी लांबविले. माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुद्देमालासह चोरट्याला ताब्यात घेतले. ही घटना बार्शी बस स्थानकावर शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
याबाबत सुलभा कवीश्वर सांगळे (रा. निजाम जवळा, ता. भूम, जि. धाराशिव, हल्ली जरगनगर, कोल्हापूर) या महिलेने फिर्याद दिली आहे.चोरीच्या प्रकारानंतर वालवड (ता.भूम) येथे माहेरी जाऊन वडील आणि व भावास घेऊन बार्शीतील शहर पोलीस ठाणे गाठले. रात्री ११ वाजता फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान शहर पोलीस रात्री गस्त घालत असताना शिवाजी कॉलेजच्या आवारात एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी शंकर सायबू जाधव ( रा.सुमित्रानगर अकलूज, हल्ली मंगरूळ ता.घनसांघवी जि. जालना) या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करता ९० हजारांचे गंठण काढून दिले.
फिर्यादी महिला सुलभा सांगळे या शुक्रवारी सायंकाळी दिवाळीसाठी त्या कोल्हापूर येथून एस. टी. ने बार्शी बस स्थानपकावर आल्या. वालवड येथे जाण्यासाठी बार्शी - पाथरूड या बसमध्ये चढताना गर्दीत संशयिताने त्यांना धक्का देऊन गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण हिसकावत होतो. सुलभा यांनी विरोध केला. पुन्हा धक्का देवुन गंठण घेऊन तो गेटमधून पळून गेला.
अंगझडतीत गंठण दिले काढून
याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हयातील वर्णना प्रमाणे संशयित व्यक्ती शिवाजी कॉलेज परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ढेरे, उपनिरीक्षक गळगटे, हवालदार अमोल माने, कॉन्स्टेबल पवार, उदार यांनी त्याला ताब्यात घेतले. चाैकशीत नाव, गाव सांगतच त्याची अंगझडती घेतली अन ९० हजारांचे गंठण काढून दिले.