अतिक्रमण काढताना मनपाचा जेसीबी चालक थाेडक्यात बचावला
By राकेश कदम | Published: August 25, 2023 01:28 PM2023-08-25T13:28:24+5:302023-08-25T13:28:58+5:30
मनपाचा जेसीबी चालक विजेच्या तारांचा धक्का लागण्यापासून थोडक्यात बचावला.
राकेश कदम. साेलापूर: महापालिकेच्या अतिक्रमण विराेधी पथकाने शुक्रवारी विजापूर राेड ते शिवदारे काॅलेज या रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. या कारवाईवेळी मनपाचा जेसीबी चालक विजेच्या तारांचा धक्का लागण्यापासून थोडक्यात बचावला.
विजापूर राेडवर इंचगिरी मठाच्या बाजूला एका चहावाल्याने फूटपाथवर अतिक्रमण केल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे काही दिवसांपूर्वी आली हाेती. या एकाच्या तक्रारीमुळे पालिकेने विजापूर राेड ते शिवदारे काॅलेज यादरम्यान फूटपाथवर असलेली सर्व अतिक्रमणे काढायला शुक्रवारी सुरुवात केली. महापालिकेच्या जेसीबी चालकाने पहिला घाव चहावाल्याच्या पत्राशेडवर घातला. या पत्राशेडच्या वरच्या बाजूला विजेच्या तारा हाेत्या. शेडवर घाव घालताना जेसीबीच्या फाडव्याच्या विजेच्या तारेला धक्का लागला. यातून स्पार्क झाला. पाेलिसांनी प्रसंगावधान राखून चालकाला थांबायला लावले. पाेलिसांनी थांबविले नसते तर अनुचित प्रकार घडला असता अशी चर्चा घटनास्थळी सुरू झाली.
यानंतर पालिकेच्या पथकाने या भागातील किराणा दुकाने व इतर साहित्याच्या दुकानांसमाेरील पत्र्याचे शेड, फलक हटवायला सुरुवात केली. येथील एका मंगल कार्यालयाच्या कमानीवर जेसीबी चाल करुन गेला. मात्र मंगल कार्यालयातील कामगारांनी मालकांना फाेन करुन माहिती दिली. यानंतर मनपा अधिकाऱ्यांना फाेन आले. त्यामुळे या मंगल कार्यालयाला अतिक्रमण काढण्यास मुदत देण्यात आली.