ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना झोपलेल्या मुलाच्या दोन्ही पायावरुन गेले चाक
By विलास जळकोटकर | Published: January 16, 2024 06:36 PM2024-01-16T18:36:39+5:302024-01-16T18:36:54+5:30
रात्रीच्या वेळी अंधार असल्याने चालकाकडून ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना पाठीमागे मुलगा झोपला असल्याच्या त्याच्या लक्षात आले नाही.
सोलापूर : शेतामध्ये झोपलेल्या दहा वर्षाच्या मुलाच्या दोन्ही पायावरुन ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना चाक गेल्याने त्याचे हाड मोडले. त्याला उपचारासाठी मंगळवारी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. महादेव मलप्पा देढे (वय- १०, रा. किणी, ता. अक्कलकोट) असे या जखमी मुलाचे नाव आहे. यातील जखमी मुलगा रातीच्या सुमारास काळेगाव (इटकळ) येथील पाटील यांच्या शेतात झोपला होता.
रात्रीच्या वेळी अंधार असल्याने चालकाकडून ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना पाठीमागे मुलगा झोपला असल्याच्या त्याच्या लक्षात आले नाही. क्षणातच ट्रॅक्टरचे चाक त्या मुलाच्या दोन्ही पायावरुन गेल्याने हाडे कडकडा मोडली. तो ओरडू लागला.
तातडीने त्याला अक्कलकोटच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटननेची नोंद झाली आहे.