गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न असताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:12+5:302021-07-24T04:15:12+5:30
सोलापूर: आर्थिक अडचणीच्या गर्तेत असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर अशासकीय सदस्य प्रशासकीय मंडळ नियुक्तीचा प्रस्ताव तपासणीसाठी आला ...
सोलापूर: आर्थिक अडचणीच्या गर्तेत असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर अशासकीय सदस्य प्रशासकीय मंडळ नियुक्तीचा प्रस्ताव तपासणीसाठी आला आहे. बरखास्त संचालक मंडळातील चौघांसह ९ लोकांचा यामध्ये समावेश आहे.
मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर ८ मार्च २०२१ रोजी संचालक मंडळ बरखास्त करून तिघांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. कर्जाचा डोंगर उभा असलेल्या दूध संघाची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रशासक मंडळ प्रयत्न करीत आहे. असे असताना ९ सदस्यीय अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तपासणीसाठी आला आहे. राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे दिलेला प्रस्ताव तपासणीसाठी सोलापूर जिल्हास्तरावर आला आहे.
चौकशी करून प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या दुग्ध व पशुसंवर्धन खात्याकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर हे करणार आहेत. राज्य शासनाकडून आलेल्या अशासकीय सदस्यांची तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
----
यांच्या नावांचा समावेश
अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार दिलीपराव माने, माजी संचालक बबनराव अवताडे, दीपक माळी, विजय येलपले तसेच वामनराव बदे, दिग्विजय बागल (करमाळा), चंद्रकांत देशमुख (सांगोला), विक्रम शिंदे (माढा) यांच्या नावांचा समावेश आहे.
-----
- माजी संचालक बबनराव अवताडे यांच्याकडे पशुखाद्य ॲडव्हान्स ९६ हजार ११८ रुपये तसेच दूध ॲडव्हान्स १ लाख २४ हजार ६१३ रुपये अशी दोन लाख २० हजार ७३१ रुपये येणेबाकी आहे. ही बाब संचालक मंडळ बरखास्तीच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.
- दूध संघावर कर्जाचा भार वाढण्यास, दूध संकलन कमी होण्यास तसेच तोट्यात संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले होते.
- १९६० चे कलम ७८ (अ) या कलमान्वये बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळातील माजी चेअरमन दिलीप माने, बबनराव अवताडे, विजय येलपले व दीपक माळी यांची नावे अशासकीय प्रशासक मंडळाच्या यादीत आहेत.
----
दूध संघ आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी संघ बंद पडेल असा काहींचा प्रयत्न आहे. प्रशासकांचे काम चांगले आहे. आम्ही न्यायालयात जाऊन अशासकीय प्रशासक मंडळाला विरोध करू.
- राजेंद्रसिंह राजेभोसले, माजी संचालक, दूध संघ
----