'डाय करूनही पांढरे केस दिसतायत,' रागात महिलेने फोडली सलूनमधील काच
By रूपेश हेळवे | Published: September 5, 2022 05:15 PM2022-09-05T17:15:05+5:302022-09-05T17:15:53+5:30
महिलेवर अदखलपात्र गुन्हा.
सोलापूर : 'तुम्ही केलेले हेअर डाय निघून गेले आहे. केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत. मला पुन्हा एकदा डाय करून द्या,' असे म्हणत सलून दुकानात येऊन दुकानातील काच महिलेने फोडली. याबाबत महिलेवर सदर बाझार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मोहम्मद साजिद सलमाने ( वय २२ ) यांनी तक्रार दिली आहे.
यातील तक्रारदार सलमाने यांचे विजापूर रोड कंबर तलावाजवळ सलून आहे. या दुकानात वर्षा नामक महिलेने १९ ऑगस्ट रोजी येऊन हेअर डाय व कलर केले होते. त्यानंतर ती महिला रविवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता दुकानात आली.
तिने तक्रारदार सलमाने याला, तुम्ही केलेले हेअर डाय निघून केस पांढरे झालेले आहेत. तुम्ही हेअर डाय कसे केले ? परत एकदा डाय करून द्या असे म्हणत तिने पार्लरमधील दोन आरसे फोडून दुकानाचे नुकसान केले, अशी तक्रार महम्मद सलमाने याने दिली आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.