व्हाईटनर नशेत सोलापुरातील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 04:51 PM2019-09-02T16:51:22+5:302019-09-02T16:53:12+5:30
मानसिक तणावाखाली घेतला निर्णय; घटनेची सिव्हील पोलीस चौकीत झाली नोंद
सोलापूर : पटवर्धन चाळ रामवाडी येथील राहत्या घरी व्हाईटनरच्या नशेत तरूणाने घराच्या छताला आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आला.
नितीन ऊर्फ टग्या सिद्राम जाधव (वय २७ रा. पटवर्धन चाळ, रामवाडी सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. नितीन जाधव हा आई, वडील यांच्या समवेत रहात होता. मोठ्या भावाचे लग्न झाल्याने तो पटवर्धन चाळीतच लांबच्या अंतरावर राहत होता. नितीन जाधव याची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. नितीन हा आईला मदत करीत होता, गेल्या काही दिवसांपासुन तो तणावाखाली होता. रविवारी रात्री नितीनची अज्जी ही आजारी असल्याने आई माहेरी गेली होती. वडील वॉचमनच काम करीत असल्याने घरी नव्हते. घरात कोणी नसल्याचे पाहुन नितीन याने साडीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
आई अज्जीच्या घरी झोपली होती, पहाटे उठुन ती भाजी विकण्यासाठी गेली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आईने मोठ्या मुलाजवळ निरोप देवुन नितीनला पाठवुन देण्यास सांगितले. मोठा भाऊ घरी गेला, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तो आतुन बंद होता. भावाने बाहेरून आवाज दिला, आतुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. तेव्हां नितीन हा गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळुन आला. नितीन याला खाली उतरवुन शासकीय रूग्णालयात दाखल केले असता, तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.