बंद दुचाकी झटपट कोण दुरुस्त करतं?, ‘टू व्हीलर मेकॅनिक’चा होणार मेळावा
By शीतलकुमार कांबळे | Published: January 4, 2024 05:22 PM2024-01-04T17:22:18+5:302024-01-04T17:22:29+5:30
या मेळाव्यात सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दीड हजार मेकॅनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी दिली.
सोलापूर : ऑटोमोबाइल्समध्ये नेहमी नवीन तंत्रज्ञान येत असते. हे नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करायचे? या संदर्भात मार्गदर्शन ‘टू व्हीलर मेकॅनिक’ मेळाव्यामध्ये होणार आहे. या मेळाव्यात सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दीड हजार मेकॅनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी दिली.
संघटनेच्या चौतिसाव्या वर्धापन दिनानिमित्त ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने या मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४मध्ये मेकॅनिक यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील कोणत्या प्रकारचे ध्येय समोर ठेवून काम करावे लागेल यासोबतच नवीन तंत्रज्ञान अवगत कसे करायचे भविष्यातील संधी आव्हाने व्यवसायाचे बदलते स्वरूप याबाबत यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
३५ स्टॉलचे प्रदर्शन
मेळावा व प्रदर्शन ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे १६ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. या प्रदर्शनात ३५ स्टॉल असणार आहेत. मेळाव्यामध्ये मेकॅनिकल यांच्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. एखादी बंद पडलेली गाडी कमीत कमी वेळात दुरुस्त करणाऱ्या वैयक्तिक तसेच संघास बक्षीस देण्यात येणार आहे.