जगी सर्व सुखी असा कोण आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:32 AM2018-11-19T10:32:25+5:302018-11-19T10:35:07+5:30

शनिवार दि. १७ नोव्हेंबरच्या लोकमतमधील बातमी ‘दारूसाठी पैशाची मागणी, मुलाने केली आई-वडिलांना मारहाण’. जन्मल्यानंतर किती आनंदात त्याचे बारसे साजरे ...

Who is the happiest person in the world? | जगी सर्व सुखी असा कोण आहे?

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

googlenewsNext
ठळक मुद्देवाचकहो, विचारी मनाने एकनाथ महाराजांनी म्हटलेले लक्षात ठेवावे‘‘कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाय जन्मासि आली’ ती त्वा आपुली मानली, कैसी रे पढतमूर्खा  ’’

शनिवार दि. १७ नोव्हेंबरच्या लोकमतमधील बातमी ‘दारूसाठी पैशाची मागणी, मुलाने केली आई-वडिलांना मारहाण’. जन्मल्यानंतर किती आनंदात त्याचे बारसे साजरे केले असेल, किती कष्टाने त्या मुलाला आई-वडिलाने वाढवले असेल आणि आज ही अवस्था.  मन दोन महिने मागे गेले. 

दोन महिन्यांपूर्वी भल्या सकाळीच दोघे नवरा-बायको भेटायला आॅफिसात आले. नवºयाला बायकोपासून सोडचिठ्ठी पाहिजे होती. त्यांचे लग्न होऊन पाच वर्षे झाली होती, परंतु त्यांना मूलबाळ झालेले नव्हते. डॉक्टरांकडे हेलपाटे चालू होते. लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता. तरीही मूलबाळ होत नसल्याने त्याचा राग काढत नवरा बायकोला भर आॅफिसात शिव्या देत होता. ती बिचारी अश्रू ढाळत सर्व ऐकून घेत होती. मी त्यास आणखी काही दिवस थांब आणि मूलबाळ झाले नाही तर दत्तक घे, असा सल्ला दिला. तो सारखा म्हणत होता, एखादा तरी मुलगा किंवा मुलगी व्हायला पाहिजे. मी त्याची खूप समजूत घातली, परंतु तो आपला हेका काही सोडत नव्हता. मी त्यास म्हणालो, मी जोडणारा वकील आहे, तोडणारा नाही.. तो आॅफिसमधून निघून गेला.

थोड्याच वेळानंतर एक माणूस आला. त्याला बायकोपासून सोडचिठ्ठी घेऊन दुसरे लग्न करायचे होते. कारण त्यास चार मुलीच होत्या. मुलगा नव्हता. मी त्याची खूप समजूत घातली. त्यास आताच्या आधुनिक काळात महिला किती प्रगती करीत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कशी भरारी मारत आहेत, हे पटवून सांगितले. आता काही दिवसानंतर मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीही फरक राहणार नाही हे देखील सांगितले, परंतु तो त्याचा हेका सोडण्यास तयार नव्हता. त्यास देखील सांगितले, बाबा, मी जोडणारा वकील आहे, तोडणारा नाही. त्यानंतर पुढे काही दिवसातच एक वृद्ध महिला मुलावर केस दाखल करण्यासाठी आली. तिच्या मुलाने तिला बेदम मारहाण करुन तिचे डोके फोडले होते. मी तिला विचारले, किती नवस केले होते? ती म्हणाली - चार. मेडिकल सर्टिफिकेटमध्ये देखील चारच जखमा डोक्यावर होत्या. मी म्हणालो, पोरगं नवसाची फेड करतोय. मी तिला सल्ला दिला, मुलीकडे जाऊन राहा. ती उत्तरली, मुलगी नाही हो मला ! नाही तर कशाला या नालायकाकडे राहिले असते. पोरगी असती तर लईच बरं झालं असतं बघा.     

वाचकहो लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या पोटी चार प्रकारची पोरं जन्माला येतात. १) घेणेकरी पुत्र - मागच्या जन्मीचे घेणेकरी या जन्मी पुत्र म्हणून जन्माला आलेली असतात. त्याला शिकवा, नोकरीला लावा, लग्न करून द्या. त्याचे देणे-घेणे पूर्ण झाले की तो आई-बापाला टाकून निघून जातो. २) शत्रू पुत्र - गतजन्मीचा शत्रू या जन्मी मुलगा म्हणून जन्माला येतो. अशी पोरं अगर पोरी जन्मभर आई-बापाला त्रास देतात आणि दु:ख देतात. ३) उदास पुत्र - ही पोरं वडिलांना सुख देत नाहीत अगर दु:खपण देत नाहीत. ४) सेवेकरी पुत्र - मागच्या जन्मी तुम्ही ज्याची सेवा केली तो या जन्मी तुमचा मुलगा होऊन येतो. असा मुलगा आई-वडिलांना खूप सुख देतो. गतजन्मी पुण्य केले असल्यास सेवेकरी पुत्र पोटी जन्माला येतात आणि जन्मभर आई-बापाची सेवा करतात. 

हे तर उघडच आहे की, आपल्या पोटी आलेले जे मुलबाळं असतात, ती काही आपल्याला सुख द्यायला येतात किंवा दु:ख देण्यासाठी येतात. प्रारब्धाचा योगच असा की, ते त्याकरिताच येतात. आपण ते जर लक्षात ठेवून वागलो नाही तर हा मुलगा असा का आणि तो मुलगा तसा का ? याला उत्तर मिळत नाही. तो कशाकरिता आला आहे हे तर ठरलेलेच आहे. समर्थांची एक ओवी आहे. ‘‘कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाय जन्मासि आली’ ती त्वा आपुली मानली, कैसी रे पढतमूर्खा  ’’

    बघा दुनियादारी, मुलंबाळं नसलेले दु:खी, केवळ मुली असलेले दु:खी आणि मुलगा असलेला पण मुलगी नसलेले देखील दु:खी ?
संत श्री रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकात म्हटले आहेच 
जगी सर्व सुखी असा कोण आहे!
विचारें मना तूंचि शोधूनि पाहें!
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले!
तयासारखें भोगणें प्राप्त झाले!!  
.. आणि वाचकहो, विचारी मनाने एकनाथ महाराजांनी म्हटलेले लक्षात ठेवावे. 
  ऐसे असावे संसारी 
  जोवरी प्राचीनाची दोरी   
पक्षी अंगणासी आले  
आपुला चारा चरोनि गेलो!   
 
 - अ‍ॅड. धनंजय माने
(लेखक ज्येष्ठ विधीज्ञ आहेत.) 

Web Title: Who is the happiest person in the world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.