एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
By अक्षय शितोळे | Published: October 10, 2024 09:50 PM2024-10-10T21:50:00+5:302024-10-10T21:53:20+5:30
इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
NCP Sharad Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होऊ लागल्याने अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती असून माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी तीन बडे नेते इच्छुक असल्याचे समजते. यामध्ये विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. मात्र लोकसभा निवडणुकीत या तालुक्याने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मोठी आघाडी दिल्याने आमदार बबन शिंदे यांना विधानसभेची लढाई सोपी असणार नाही, हे निश्चित झाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच बबन शिंदे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेणार असून चिरंजीव रणजीत शिंदे हे निवडणूक रिंगणात असतील, अशी घोषणा केली. तसंच शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास हाती तुतारी घेऊ अन्यथा अपक्ष लढू, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर शिंदे पिता-पुत्राने शरद पवार यांची भेटही घेतली आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या अभिजीत पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पवार यांची साथ सोडत साखर कारखान्यातील अडचणींमुळे महायुतीला साथ दिली होती. मात्र हेच अभिजीत पाटील हे माढ्यातून तुतारी हाती मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हेदेखील मागील काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर असून माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात आणि कोणाच्या हाती तुतारी देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.