तू आमच्या विरोधात तक्रार का केली, तुझे हातपाय तोडून टाकेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:17+5:302021-09-08T04:28:17+5:30
ज्ञानेश्वर काशिनाथ करपे (गणेश नगर टाकळी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी व २५ ऑगस्ट २०२१ ...
ज्ञानेश्वर काशिनाथ करपे (गणेश नगर टाकळी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी व २५ ऑगस्ट २०२१ रोजी पंढरपूरचे नायब तहसीलदार पंडित कोळी महसूल यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून मला ३ स्पटेंबर २०२१ रोजी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी त्यांच्या केबिनमध्ये धमकी दिली. सुशील बेल्हेकर हे लोकांना गुन्हा दाखल करण्याची धकमी देत असतात. जबाबदार अधिकारी असताना ते सामान्य नागरिकांना गुंडगिरीची भाषा बोलतात. यामुळे माझ्या जिवाला सुशील बेल्हेकर यांच्यापासून धोका आहे. माझ्या जिवाला धोका झाल्यास त्यास जबाबदार बेल्हेकर असतील. तेव्हा आपण माझ्या तक्रारीची सत्यता पडताळणी करून आपली खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करपे यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
......
या कामासाठी लागतात एवढे पैसे; दप्तराची तपासणी करा
पंढरपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पंडित कोळी हे सामान्य नागरिकांकडून सरकारी कामासाठी अवैधरीत्या पैसे घेतात. शिधापत्रिकेमध्ये नाव वाढविण्यासाठी व नाव कमी करण्यासाठी ५० रुपये घेतात. नवीन व ट्रान्स्फर शिधापत्रिका टिपणी मंजुरीसाठी, दुबार शिधापत्रिकेवर सहीसाठी १०० रुपये लागतात. पुनर्वसन प्रकरणावर सही करण्यासाठी व अंगठा स्कॅन प्रकरणासाठी एक हजार रुपये घेतात. पंडित कोळी यांनी केलेल्या कामकाजाची व त्यांच्या दप्तरातील कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करपे यांनी केली आहे.
..........
तहसीलदारांकडून नो रिस्पॉन्स
याबाबत सत्यता पडताळून पाहण्यासाठी तहसीलदार बेल्हेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. मेसेस गेल्यानंतर नातेवाईक आजारी असल्याचे उत्तर दिले. मात्र, या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळले.