उद्योगमंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही?; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By Appasaheb.patil | Published: November 9, 2022 01:37 PM2022-11-09T13:37:34+5:302022-11-09T13:38:47+5:30
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते सांगोला तालुक्यात शेतीपिकांचे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
सोलापूर : राज्यात येणारे अनेक उद्योगधंदे, प्रकल्प बाहेरील राज्यात जात असताना आपल्या राज्याचे उद्योगमंत्री काय करतात ? लाखो लोकांना रोजगार मिळवून देणारे प्रकल्प मागील काही महिन्यात अन्य राज्यात गेले, त्यामुळे राज्यातील बेरोजगारांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने उद्योग आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री फेल होत असताना त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का घेतला नाही असा सवाल युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते सांगोला तालुक्यात शेतीपिकांचे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे आहेत. देगांव येथील ठाकरे सेनेच्या शाखा उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासोबत संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पुरूषोत्तम वानकर, विठ्ठल वानकर, अमर पाटील, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांच्यासह अन्य शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मी राज्याच्या विविध भागात दौरा करीत आहेत. या दौऱ्यात मी शेतकरी, युवक-युवती, उद्योजकांशी भेटत आहे, चर्चा करीत आहे, संवाद साधत आहे. मात्र कोणीही या सरकारच्या कामावर समाधानी नाहीत. राज्यात येणारे मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले, त्यामुळे रोजगार मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दोन लाख लोकांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प अन्य राज्यात गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.