सोऽऽनू ....तुला वीज बिल भरायचं नाय का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:01+5:302021-03-15T04:21:01+5:30
सोलापूर : सोऽऽनू... तुला वीज बिल भरायचं नाही का ? सोनू आमचा ग्राहक लाडका लाडका...आम्ही त्याला वीज देतो ...
सोलापूर : सोऽऽनू... तुला वीज बिल भरायचं नाही का ? सोनू आमचा ग्राहक लाडका लाडका...आम्ही त्याला वीज देतो बरं का बरं का... सोनूची कॉलर लई टाईट टाईट... पण वीज बिल भरायला वाटते वाईट वाईट...सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का? अशा शब्दात महावितरणने शेतकऱ्यांना साद घालत वीज बिल वसुलीची अफलातून मोहीम चालवली आहे.
वीज बिल भरण्यासाठी महावितरणने यावेळी नवी शक्कल लढवली. ग्राहकाकडून वीज बिलाची वसुली करताना त्यांना न दुखविता लाडिवाळपणे हाक दिली जात आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
गेले चार दिवस दक्षिण तालुक्याच्या ग्रामीण भागातून महावितरणची गाडी गावोगावी सोनूचे गाणे ऐकवत फिरत आहे. घरगुती वापराच्या वीज बिलासाठी ही गाण्याची धून असली तरी कृषी पंपाच्या थकबाकीबाबत शेतकरी वर्गाचेही चांगले प्रबोधन होत आहे.
३५७ कोटींची वीज बिल थकबाकी
दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा, सीना आणि हरणा या तीन नद्या वाहतात. नद्यांच्या परिसरात आठ महिने पाणी उपलब्ध असल्याने बागायत क्षेत्र वाढले आहे; मात्र गेल्या २० वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी शेती पंपाची वीज बिले भरली नाहीत. त्यामुळे तालुक्याची थकबाकी ३५७ कोटींपर्यंत गेली आहे .
चार दिवसांत १ कोटी ६१ लाखांची वसुली
वीज बिल वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी गावोगावी प्रबोधन करीत आहेत यातून शेतकऱ्यांना विजेचे महत्त्व, बिलातील सवलत याबाबत जागृती केली जात आहे. परिणामी भीमा नदीकाठच्या गावात याला चांगला प्रतिसाद मिळत असून चार दिवसात एक कोटी ६१ लाखांची वसुली झाली आहे.
कोट :::::::
वीज बिलाच्या वसुलीसाठी शेती पंपाची वीज तोडण्याशिवाय पर्याय नसला तरी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन थकबाकी वसूल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जागृती मोहिमेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
- संजीव कोंडगुळी,
उपअभियंता, महावितरण
फोटो१४ दक्षिण सोलापूर०१
ओळी : शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव उमाशंकर पाटील यांनी थकित वीज बिल भरल्यानंतर सत्कार करताना अंकुश नाळे, ज्ञानदेव पडळकर, संजीव कोंडगुळी आदी.