अवघ्या २२ रुग्णांसाठी का लादता संचारबंदी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:11+5:302021-08-12T04:26:11+5:30
पंढरपूर शहर हे वर्षातून भरणाऱ्या चार मोठ्या यात्रांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणारे गाव आहे. मात्र, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड ...
पंढरपूर शहर हे वर्षातून भरणाऱ्या चार मोठ्या यात्रांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणारे गाव आहे. मात्र, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या यात्रा भरण्यास शासनाने प्रतिबंध केल्याने सर्व लहान, मोठे व्यापारी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. दीड, दोन वर्षांपासून व्यापार, उद्योग बंद असल्याने म्युनिसिपल टॅक्स, लाईट बिल, दुकान भाडे, बँकांची कर्जे भरण्यास सर्वच
लहान, मोठे व्यापारी असमर्थ झाले आहेत. वास्तविक पाहता शासनाने कोविडच्या निबंधामध्ये शहर आणि ग्रामीण हे घटक वेगवेगळे करणे गरजे आहे. पंढरपूर शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास असून काेविड रुग्ण संख्या केवळ २० ते २२ अशी अत्यंत नगण्य आहे. मात्र, ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आपण पंढरपूर शहरावर निर्बंध घातले आहेत, ते चुकीचे असून वास्तव परिस्थितीला धरून नाही तेव्हा शहरी व ग्रामीण असे वेगळे घटक करून कोविड नियमांची अंमलबजावणी करावी. अशी मागणी या आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांनी केली आहे.
यावेळी पंढरपूर शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहळकर, राजगोपाल भट्टड, नंदकुमार कटक, वैभव यवनकर, कैलास करंडे, सोमनाथ डोंबे, संजय भिंगे, दीपक शेटे, कौस्तुब गुंडेवार, प्रिन्स गांधी, विनोद लटके, पांडुरंग बापट, दत्ता रजपूत, संतोष कवडे उपस्थित हाेते.
---
विठ्ठल मंदिर खुले करा
श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे भाविक पंढरपुरात येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय होत नाही. व्यापाऱ्यांवर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना नगरपालिकेचा कर माफ करावा, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.
---
फोटो : १० पंढरपूर
पंढरपूर येथे घंटानाद आंदोलन करताना शहरातील व्यापारी.