पुन्हा रंगणार का परिचारक-भालके सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:20 AM2021-03-22T04:20:56+5:302021-03-22T04:20:56+5:30
पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी रविवारी रविवारी भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक ...
पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी रविवारी रविवारी भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नावे जाहीर केली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, माजी पालक मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील, श्रीकांत देशमुख, बी. पी. रोंगे, भास्कर कसगावडे उपस्थित होते.
पुढे भेगडे म्हणाले, आमदार. प्रशांत परिचारक, धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, उद्योजक समाधान आवताडे, स्वेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी भाजपाकडून पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितले.
मागील दोन निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक व माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांना दिवंगत आ. भारत भालके यांनी चितपट केले होते. यामुळे परिचारक यांना पुन्हा उमेदवारी देताना भाजपाकडून मागील अनुभवाचा विचार केला जाणार आहे.
तर सध्या तीन साखर कारखाने यशस्वीरीत्या चालवल्यामुळे अभिजित पाटील यांच्याविषयी पंढरपूर मंगळवेढ्यात मोठ्या प्रमाणात सकारात्मक चर्चा आहे. त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मराठा समाजाचे मतदान निर्णायक ठरले आहे. यामुळे भगीरथ भालके यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून अभिजीत पाटील यांचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक की अभिजित पाटील यांच्यापैकी कोणता उमेदवार द्यायचा, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर समाधान आवताडे यांनी भाजपच्या लोकांशी प्रत्यक्षरीत्या संपर्क केला नाही. फक्त फोनवरून उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे उद्या भाजपने उमेदवारी दिली नाही तरी, आवताडे भाजपविरुद्ध बंडखोरी करू शकतात.