उपचारास न नेल्याने पत्नीचा मृत्यू ; पतीविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:52+5:302021-06-27T04:15:52+5:30
फिर्यादी उमा शंकर चव्हाण (वय ६९, रा. नेहरूनगर, सोलापूर) यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह १४ मे २००५ रोजी लिंगराज ...
फिर्यादी उमा शंकर चव्हाण (वय ६९, रा. नेहरूनगर, सोलापूर) यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह १४ मे २००५ रोजी लिंगराज दामू पवार याच्याबरोबर झाला होता. जावई लिंगराज हे आरोग्य खात्यात नोकरीस होते. मयतास २४ फेब्रुवारी २००६ रोजी मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या कारणावरून जावई लिंगराज हे नाराज असल्याने वारंवार अश्विनीस उपाशी ठेवून मुलगा होण्यासाठी त्रास देऊन मी दुसरे लग्न करणार आहे, तू घटस्फोट दे नाही तर तुला खलास करून टाकीन, अशी दमदाटी करत असे. तद्नंतर मंगळवेढ्यातील प्रतिष्ठित लोकांकडून त्यास समज देण्यात आली. त्यामुळे काही दिवस व्यवस्थित नांदवले.
१५ एप्रिल २०२१ रोजी अश्विनीस श्वास घेता येत नव्हता, तिच्या रक्ताच्या उलट्या झाल्या, तिला उपचारास घेऊन जा, असे फिर्यादीने पाया पडून सांगितले. तरीसुद्धा उपचारास नेले नाही. २२ एप्रिल रोजी अश्विनी हिस बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.४० च्या दरम्यान ती मयत झाली. त्यानंतर फिर्यादीचे जावई लिंगराज पवार याने मंगळवेढ्यात येऊन अश्विनीच्या दवाखान्याची कागदपत्रे जाळून टाकली व नात श्रध्दा हिस कोणास काही एक सांगू नको म्हणून दमदाटी केली. तुम्ही कोठे तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. मयत अश्विनी हिस कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही तिला वेळेत उपचारार्थ दाखल न केल्याने ती मयत झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास शहर बीटचे पोलीस करीत आहेत.